महाविद्यालयातील कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानेच होणार – उदय सामंत

महाविद्यालयातील कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानेच होणार – उदय सामंत

मुंबई – विद्यार्थ्यांनी देशभक्तीची भावना जपली पाहिजे, त्यांना स्वातंत्र्यामागच्या बलिदानाचे महत्व कळावे, यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीतानेच करावी, असा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

मुंबई आणि महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण, यांच्या संयुक्त विद्यमाने एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

सामंत म्हणाले, चित्रपटगृहामध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्र्रगीत होत असते. देशासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती निर्माण व्हावी, यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीतानेच झाली पाहिजे. आपल्या मातृभाषेचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. सर्व महाविद्यालयाच्या नावाचे फलक हे मराठीतच लावावेत, अशा सूचनाही महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची या महाविद्यालयात पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. याच महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचा पत्रकारितेचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात येईल. तसेच महाविद्यालयाच्या सभागृहासाठी 2 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीसाठी स्वतंत्र कुलगुरुंची नियुक्ती लवकरच करण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

मराठी पत्रकारीतेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि हिंदी पत्रकारीतेचे पितामह बाबूराव पराडकर यांच्या स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी म्हणाले, एलफिन्स्टन महाविद्यालयच एक मोठा इतिहास आहे. बाळशास्त्री जांभेकर या परिसरात वावरल्याने या महाविद्यालयाच्या वास्तुला त्यांचा स्पर्श झालेला आहे. पत्रकार सर्व समाजघटकांच्या समस्या माध्यमातून मांडत असतो पण त्यांच्या स्वत:च्या समस्यांकडे शासनाने लक्ष द्यावे. पत्रकारांना पेन्शन म्हणून दरमहा फक्त 11 हजार रुपये मिळतात, त्यामध्ये वाढ करुन किमान 15 हजार रुपये तरी करावी, असेही श्री. जोशी यांनी सांगितले.

विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे म्हणाले, प्राध्यापक हे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत असतात. मिडियातील बदलते विषय, आधुनिक पत्रकारितेतील तंत्रज्ञान असा सर्वसमावेश नवीन अभ्यासक्रम तयार करुन या महाविद्यालयात सुरु करावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मुकनायक’च्या माध्यमातून शोषित, वंचितांच्या व्यथा मांडल्या त्यांचेही शताब्दी वर्ष सुरू होत आहे. बाळा शास्त्री जांभेकर यांचे राष्ट्रीय स्मारक मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात उभारण्याचा शासनाने विचार करावा, असेही श्री. सपाटे यांनी सांगितले.

मराठी पत्रकार संघाचे सदस्य महेश पावसकर म्हणाले, एलफिन्स्टन महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळणे म्हणजे ही भाग्याची गोष्ट आहे. मराठी वृत्तपत्रकारितेचे जनक आचार्य जांभेकर यांनी या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आहे, असे श्री. पावसकर यांनी सांगितले.

मुंबई आणि महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटणचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले ग्रंथालय, पहिले वृत्तपत्र, पहिले प्राध्यापक म्हणून आपले पहिलेपण जोपासत महान कार्य केले. परदेशातील विद्यार्थी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत असतात. आचार्य जांभेकर यांनी प्राचिन लिपींचा अभ्यास करुन कोकणातील ‍शिलालेख व ताम्रपट यावर शोधनिबंध लिहिले. त्यांच्या संशोधन व लिखाण यावर आधारित अभ्यासक्रम तयार करुन आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रशिक्षण केंद्र उभे करावे. तसेच टाऊन हॉल येथील सेंट्रल लायब्ररीमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तैलचित्र लावण्यात यावे, असेही श्री. बेडकिहाळ यांनी सांगितले.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ.माधुरी कागलकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली.यावेळी ज्येष्ट पत्रकार योगेश त्रिवेदी, नेहा पुरव आदी उपस्थित होते.

COMMENTS