पेटलेल्या मराठा आरक्षणावर उदयनराजेंनी पहिल्यांदाच मांडली रोखठोक भूमिका !

पेटलेल्या मराठा आरक्षणावर उदयनराजेंनी पहिल्यांदाच मांडली रोखठोक भूमिका !

मुंबई – राज्यभरात पेटलेल्या मराठा आरक्षणावर पहिल्यांदाच खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली रोखठोक भमिका मांडली आहे. हे फार पूर्वीच व्हायला हवं होतं, आरक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांचं म्हणणं मी माझ्या माध्यमातून मांडत आहे. कोणाचीच हरकत नसेल तर कित्येक वर्षे हा प्रश्न का सोडवला गेला नाही. हा वंचितांचा प्रश्न आहे, तो माझ्याही मनात आहे. कोणाचाच विरोध नसताना हा विषय सुटला नाही याचं कारण इच्छाशक्तीचा अभाव आणि राजकारण कारणीभूत असल्याचंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आयोगाच्या कामाला गती देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे, सरकारकडे सगळी माहिती उपलब्ध आहे, ती त्यांनी पाठवावी. त्याचप्रमाणे आयोगाला तांत्रिक पाठबळ पुरवावं. ॲट्रोसिटीच्याबाबतीत जी तत्परता केंद्र आणि राज्य सरकारनं दाखवली तीच तत्परता आरक्षणाच्या बाबतीत दाखवायला हवी होती असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे. तसेच हा विषय मागेच मार्गी लागला असता आज त्यासाठी कुणाचे बळी गेले नसते, कुटुंबांची वाताहत झाली नसती. आत्महत्या केल्यानंतर सरकारकडून मदत दिली जाईल. पण त्याला अर्थ नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन होत आहे. मात्र त्याला हिंसक वळण लागायला नको. मराठा आरक्षण आंदोलनाला राजकारणाची जोड देऊ नका. त्यांना कोणी प्रवृत्त केलं नाही तर त्यांच्यावर वेळच तशी आली असल्याचंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांनी याकडे माणूसकीच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिलय त्या लोकांप्रती आपल्या जबाबदारीची जाणिव लोकप्रतिनिधींनी ठेवायला पाहिजे. आंदोलनातून वेदना व्यक्त होतेय. त्यांचावर गुन्हे दाखल होताहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा याचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. आणखी किती वर्षे लागणार ते सांगून टाका एकदाचं. नुसताच वेळ घालवला जातोय.  जसं इतरांना आरक्षण दिलं तसं मराठा, मुस्लिम, धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे ही अपेक्षा रास्त आहे. आतापर्यंत फक्त टोलवाटोलवी केली गेली, यापुढे ते खपवून घेतलं जाणार नाही. निवडणूका आल्याच आहेत. जनता दाखवून देईल असे खडे बोलही उदयनराजेंनी राज्य आणि केंद्र सरकारला सुनावले आहेत.

 

COMMENTS