बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली – उध्दव ठाकरे

बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली – उध्दव ठाकरे

मुंबई: ‘मध्यंतरी काही लोकांनी पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांची तोंडं बंद झाली आहेत. कारण, पोलिसांचे कर्तृत्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्यामुळंच कोणी कितीही आदळआपट केली तरी ते पोलिसांच्या कर्तृत्वाला डाग लावू शकणार नाहीत,’ असा टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना टोला मारला.

नववर्षाच्या निमित्तानं मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ‘पोलीस दक्ष राहतात. काम करतात म्हणून आम्ही सण साजरे करू शकतो. या जाणिवेतून मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून पोलिसांचे आभार मानायला आलो आहे,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘पोलिसांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यांचा प्रत्येक क्षण तणावात जातो. करोनाच्या काळात काही पोलीस शहीद झाले. काही हजार पोलिसांना करोनाने ग्रासले. पण पोलीस दल काम करत राहिले. त्यांना कुटुंब नव्हतं का? पोलिसांनी जर तेव्हा ‘वर्क फ्रॉम होम’ केलं असतं तर काय झालं असतं?,’ असा सवाल करत, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केले. करोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. इतर देशांमध्ये हा धोका आणखी वाढला आहे, त्यामुळं जर सर्व उघडलं तर ते चुकीचं ठरेल. पोलिसांवरही विनाकारण ताण येईल,’ असं ते म्हणाले.

COMMENTS