ही उष्णता सरकारला कळली नाही तर सिंहासन जळून जाईल –उद्धव ठाकरे

ही उष्णता सरकारला कळली नाही तर सिंहासन जळून जाईल –उद्धव ठाकरे

पुणे – रविवारपासून मी शेतकरी आणि जनतेच्या भेटी घेतो आहे, परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सरकारविरोधात वातावरण गरम झालं आहे ही उष्णता सरकारला कळली नाही तर सिंहासन जळून जाईल अशी बोचरी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसत्या थापा मारत फिरत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. रोज कुठून तरी सांगत असतात की २०३० पर्यंत सर्वांना घरे मिळतील. म्हणजे तुम्हाला त्यांना मतं द्यावी लागणार. नुसत्या घोषणांचा पाऊस पाडायचा आणि मतं मागायची एवढेच त्यांना जमते असे दिसते आहे. दुष्काळाची परिस्थिती असताना घोषणांचा आणि आश्वासनांचा पाऊस सुरु आहे. गाजरांच्या शेतीसाठी मतांचा पाऊस पाडू नका असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. शिरुरमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर आणि फडणवीस सरकारवर टीका केली.

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज राजगुरुनगरमध्ये सभा पार पडली. राजगुरुनगर शहरातील नवीन पुलाचं उद्घाटन तसेच हुतात्मा राजगुरु, हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव यांच्या पुतळ्यांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा घेतली.

तसेच परिस्थिती बिकट आहे, वातावरण तापलेलं आहे/ ही उष्णता राज्यकर्त्यांनी ओळखावी, नाहीतर त्यात त्यांची सिंहासन जळून खाक होतील असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान शिर्डीत म्हणाले २०३० पर्यंत सगळ्यांना घरं मिळणार, अशा थापा मारायच्या आणि मत मिळवायचे असं त्यांचं काम आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे असं लोकमान्य टिळक म्हणाले होते, पण आज जे काही चाललंय त्याला स्वराज्य म्हणता येईल का ? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दुष्काळ दुष्काळ म्हणत असताना नुसताच योजना आणि थापांचा पाऊस आहे.त्यामुळे गाजराच्या शेतीला मतांचं पाणी घालू नका अस आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे. दुष्काळात धरणं सुकली असून राष्ट्रवादी वाल्यांना तिकडे फिरकू देऊ नका. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही. केवळ आकडेवारी सांगातली जाते, ती फसवी आहे.मी सर्वसामान्यांची बाजू मांडतो, ते सरकारच्या विरोधात असेल तर आहे मी सरकारच्या विरोधात. खोटं बोलून मला मतं नकोयत, अच्छे दिन बदद्ल गडकरी जे बोलतात तो कोडगेपणा आहे. दिवाळीत फटाके वाजवायचे की नाही याचा कोर्ट निर्णय घेणार, मग फराळही कोर्टानेच वाटावा असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. मी कुठल्या एका धर्माच्या विरोधात नाही, रमजानमध्ये युद्धबंदी करायची आणि दिवाळीत आमच्यावर बंदी आणायची, बैलगाडा शर्यतीवर बंदी आणणार असाल तर घोड्यांच्या शर्यतींवरही बंदी आणा. आमच्यावर निर्बंध आणले जातात असा कारभार सुरु आहे. आताही आमचेच सरकार येणार, आम्हीच मुख्यमंत्री होऊ असं ते म्हणतात. ही ५ वर्षे आम्ही कशी काढली आमचं आम्हालाच माहित आहे. तेव्हा काय करायचं ते तुम्ही ठरवा असही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS