मुख्यमंत्र्यांच्या टीकेला शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर !

मुख्यमंत्र्यांच्या टीकेला शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर !

मुंबई – पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सामना संपादकीयतून मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवण्यात आला आहे.

 सामना संपादकीय

बेइमानीचा पराभव सुरु झालाय. चिंतामण वनगा आयुष्यभर आदिवासी पाड्यांवर भगवा ध्वज हाती घेऊन काम करीत राहिले. मात्र त्यांची मरणोत्तर उपेक्षा करणे आणि राजेंद्र गावीत यांच्यासारखे दलबदलू लोक आयात करून हेच वनगांचे राजकीय वारसदार बरं का, असे आता जाहीर सभांतून सांगणे यालाच बेईमानी म्हणतात साहेब. मुख्यमंत्री पैशांचा पाऊस पाडत आहेत, पण सत्य व प्रामाणिकपणाचा म्हणजे चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचाच विजय होईल.  कर्नाटकात आमदारांना विकत घेऊन राज्य आणू पाहणाऱ्या रामलालूंसारख्या धनदांडग्याचं काही चाललं नाही. महाराष्ट्र तर शिवरायांची पवित्र भूमी आहे. पालघरला असे बेईमान, भ्रष्ट रामलू पाचोळ्यासारखे उडून जातील.

एखाद्या राज्यातील ग्रामपंचायात निवडणुकीतही भाजपचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्या-राज्यांचे मुख्यमंत्री, इतर फौजफाटा साग्रसंगीत उतरत असतो, तसा फौजफाटा पालघरलाही उतरला आहे. मंत्रालय ओस पडले आहे. महाराष्ट्राचे सर्व प्रश्न जणू सुटले आहेत आणि फक्त पालघरच्या पोटनिवडणुकीचा प्रश्नच तेवढा बाकी आहे असे सत्ताधारी भाजपचे वागणे आहे.

पालघरची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी थैल्या घेऊन त्यांनी मंत्रिमंडळच उतरवले आहे. मात्र अंतिम विजय हा शिवसेनेचाच होणार आहे.  आम्हला आश्चर्य वाटते ते भाजपने सुरु केलेल्या बेताल प्रचाराचे. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे भाजपकडून कोणी फिरकले नाही. मुख्यमंत्री सोडाच, पण जिल्ह्यातील संघ आणि भाजप परिवाराने पाठ फिरवली. वनगा यांचे निधन दिल्लीत झाले. त्यांच्या निवासस्थानापासून ‘भाजप’ कार्यालय पाच मिनिटांवर आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाईंचे घर तीन मिनिटांवर. इतरही भाजप परिवार आसपास असतो. कोणी त्यांच्या पार्थिवावर फूल वाहण्यास गेले नाही.

वनगा हे मरेपर्यंत भाजपशी इमान राखूनच होते. त्यांच्या इमानदारीची किंमत मरणानंतर संपली व वनगा कुटुंबियांना जणू वाऱ्यावरच सोडण्यात आलं. त्यानंतर ते सर्व कुटुंब शिवसेना परिवारात सामील झाले. यात मुख्यमंत्र्यांना बेईमानी वैगरे दिसत असेल तर राजभाषा कोश नव्यानं लिहावा लागेल.भारतीय चलन फाडून फेकणे हा देशद्रोहाचा गुन्हा आहे, परंतु भाजप खासदार किरीट सोमय्या यांना वाचविण्यासाठी सरकार कामास लागते आणि वनगा कुटुंबियांना साधा फोन करायला कुणी तयार नाही. यालाच बेईमानी म्हणतात मुख्यमंत्री साहेब.

COMMENTS