काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य !

काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य !

मुंबई – राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची बोलणी सुरू आहे. याबाबत आज काँग्रेसच्या नेत्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठकही झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह सुभाष देसाई, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे हे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी संभाव्य आघाडीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. ‘घाई करू नका. लवकरच निर्णय येईल. चर्चा योग्य दिशेने सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या बैठकीत किमान समान कार्यक्रम काय राहील यावर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आहे. तसेच शिवसेना आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर देखील चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या संभाव्य आघाडीच्या उभारणीसाठी हालाचालींना आणखी वेग येणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

शरद पवारांचा आमदारांना सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेसोबतच्या सत्तावाटपाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला असल्याची माहिती आहे. आमदारांनी आता आपल्या मतदारसंघात जाऊन कामाला सुरुवात करावी. अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, त्याबाबत त्यांना दिलासा देण्याचं काम करावं. आपण ज्या मतदारसंघात निवडणूक जिंकली आहे तिथं जाऊन नेत्यांनी आभार दौरे करावेत असं पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेसोबतच्या सत्तावाटपाबाबत चर्चा झाली. तसेच सध्या राजकीय अस्थिरतेचं चित्र आहे. राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निवडणुका होणार का?, याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या मनातही हीच भीती आहे. याबाबत शरद पवारांनी आमदारांच्या बैठकीत आमदारांनी चिंता करू नये, महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होणार नसल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS