महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार – उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार – उद्धव ठाकरे

मुंबई – महाराष्ट्रावर भगवा फडकणार असून आगामी काळात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कितीही आव्हाने आली तरी विरोधकांच्या छाताडावर शिवेसनेचा मुख्यमंत्री बसविणार असल्याचं आज उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त गोरेगाव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरातील भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. माझे सैन्य आता इरेला पेटले आहे. त्यामुळे सेनापतींचे काम निम्म कमी होणार  असून नियमाप्रमाणे सदस्य म्हणून मी माझी नोंदणी केली आहे. तुम्हीही आता त्याकडे लक्ष द्या असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना म्हटलं आहे.

दरम्यान सत्तेच्या लालसेसाठी मला भगवा फडकावयचा नाही. अशा मुख्यमंत्र्याला मी खुर्चीवर बसूही देणार नाही. लोकांसाठी मला सत्ता हवी आहे, असही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. माझा पक्ष शिवसेना हा महाराष्ट्रातील नंबर एकचा पक्ष झाला पाहिजे. त्यासाठी तयारी करा. फोनच्या मिस कॉलवर मला सदस्य नको. मला हवं ते रोखठोक. समोरासमोर, केवळ फोनवर होणारे सदस्य मला नको असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जम्मू-काश्मिरमधील पीडीपी सरकाराचा पाठिंबा भाजपने काढला. भाजपने हा निर्णय उशिरा घेतला तरी मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र पाकिस्तानला पूर्ण ठेचल्यावर मी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतो  असं आव्हानही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिलं आहे.

 

COMMENTS