राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या ऑफरवर उज्ज्वल निकम यांनी दिली  “अशी” प्रतिक्रिया !

राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या ऑफरवर उज्ज्वल निकम यांनी दिली  “अशी” प्रतिक्रिया !

मुंबई – लोकसभेच्या तयारीसाठी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काथ्याकूट सुरू आहे. काँग्रेससोबतचं जागावापाचं भिजत घोंगडं तसंच आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाली. त्याचसोबत ज्या जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत. त्या ठिकाणी उमेदवारीबाबत चर्चा झाली. जळगाव लोकसभा मतदारसंघही राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. गेले अनेकवर्ष या मतदारसंघात राष्ट्रवादीला यश आलेलं नाही. त्यामुळं आता राष्ट्रवादी तिथं तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

उज्ज्वल निकम यांची जनमानसात असलेल्या प्रतिमेचा उपयोग होईल असं राष्ट्रवादीला वाटतंय. तसंच स्थानिक नेत्यांचाही निकम यांच्या उमेदवारीला विरोध नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस निकम यांनी उमेदवारी स्विकारावी यासाठी प्रयत्नशील आहे. पक्षाचे नेते अरुण गुजराथी यांच्यावर निकम यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी दिल्याची चर्चा आहे. गुजराथी यांनी निकम यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. मात्र निकम यांनी निवडणूक लढवण्यास फारसे उत्सुक नसल्याचं सागितलं आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा हिरमोड होऊ शकतो. मात्र राष्ट्रवादीकडून पुन्हा एक दोन दिवसांनंतर निकम यांच्याशी संपर्क केला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या विनवणीला ते कसा प्रतिसाद देतात ते पहावं लागणार आहे.

COMMENTS