उल्हासनगरमध्ये भाजपला धक्का, पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय !

उल्हासनगरमध्ये भाजपला धक्का, पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय !

उल्हासनगर –  उल्हासनगर महापालिकेच्या पॅनल क्रमांक 17 साठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमन सचदेव या 2690 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी उल्हासनगर महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप आणि टीम ओमी कलानीच्या उमेदवार साक्षी पमनानी वले यांचा 200 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन दिलं होतं. तर या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेसच्या जया साधवानीदेखील रिंगणात होत्या, त्यांना अवघी 913 मतं मिळाली आहेत. या प्रभागात राष्ट्रवादीच्या तत्कालीन नगरसेविका पुनमकौर लबाना यांचं जातवैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचं समोर आल्यामुळे त्यांच्याठिकाणी ही पोटनिवडणूक घेण्यात आली आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी कुख्यात डॉन पप्पू कलानी याचा मुलगा ओमी कलानी याने भाजप उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. परंतु राष्ट्रवादीच्या सुमन सचदेव यांनी जोरदार मुसंडी मारत आपला गड राखण्यात यश मिळवलं आहे.

COMMENTS