‘एमआयएम’सोबत युती तुटल्यानंतर वंचित बहूजन आघाडीत ‘हा’ पक्ष सामील होणार ?

‘एमआयएम’सोबत युती तुटल्यानंतर वंचित बहूजन आघाडीत ‘हा’ पक्ष सामील होणार ?

मुंबई – लोकसभा निवडणुकीत दमदार सुरुवात करणाय्रा वंचित बहूजन आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी फूट पडली आहे.
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन एमआयएमनं वंचित बहूजन आघाडीची साथ सोडली आहे. त्यानंतर आता वंचित बहूजन आघाडीत नवा पक्ष सामील होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
वंचित बहुजन आघाडीत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष वंचित बहूजन आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांची ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक झाली. दादरच्या आंबेडकर भवनात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. आप’चे नेते अरविंद केजरीवालही या युतीसाठी अनुकूल असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात वंचितला आपची साथ मिळेल असं दिसत आहे.

दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये आगामी विधानसभा निवडणूक
स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ९८ जागांची मागणी केली होती. पुढे त्यात बदल करून किमान ७४ जागा तरी द्याव्यात, अशी विनंती केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचा निर्णय होऊ शकला नव्हता. त्यामुळे एमआयएममध्ये नाराजी आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंत जलील यांनी व्यक्त केली होती.
तसेच एमआयएमनं आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता वंचित बहूजन आघाडी ‘आप’ला सोबत घेणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS