बीडमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ‘हे’ बडे नेते वंचित बहूजन आघाडीच्या वाटेवर ?

बीडमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ‘हे’ बडे नेते वंचित बहूजन आघाडीच्या वाटेवर ?

बीड – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि काँग्रेसच्या सभापतींनी वंचित बहूजन आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादीचे केजमधील माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी उपस्थिती लावली. या दोन नेत्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर या दोन्ही नेत्यांना वंचित बहूजन आघाडीनं उमेदवारी दिली तर केज आणि परळी मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

पृथ्वीराज साठे -राष्ट्रवादी

दरम्यान वंचित बहूजन आघाडीतील अशोक सोनवणे, रेखाताई ठाकूर, किसन चव्हाण, अण्णाराव पाटील ही चार सदस्यीय समिती शासकीय विश्रामगृहावर इच्छुकांच्या मुलाखती घेत आहे. या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये केज मतदारसंघासाठी पृथ्वीराज साठे, परळी मतदारसंघासाठी राजेसाहेब देशमुख, भिमरावजी सातपुते, माजलगाव मतदारसंघासाठी गंगाभीषण थावरे, गेवराईसाठी विष्णू देवकते यांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे यापैकी कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहण गरजेचं आहे.

राजेसाहेब देशमुख -काँग्रेस

उमेदवारी आपल्यालाच मिळणार – सातपुते

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी परळी मतदारसंघातून उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा आत्मविश्वास वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भिमराव सातपुते यांनी व्यक्त केला आहे. गेली अनेक दिवसांपासून आपण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून परळी मतदारसंघात आपला मोठा जनसंपर्क आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीसाठी आपण अनेक दिवसांपासून काम करत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आपल्याला उमेदवारी दिली तर याठिकाणची जनता आपल्यालाच निवडून देईल असंही सातपुते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नवीन चेहरा म्हणून वंचित बहुजन आघाडीकडून सातपुते यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

भिमराव सातपुते – वंचित बहुजन आघाडी

COMMENTS