काँग्रेसला धक्का, पृथ्वीराज चव्हाणांचे कट्टर समर्थक वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर ?

काँग्रेसला धक्का, पृथ्वीराज चव्हाणांचे कट्टर समर्थक वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक व काँग्रेसचे आमदार असलेले जयकुमार गोरे हे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आमदार गोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे गोरे लवकरच वंचित बहूजन आघाडीत जातील अशी चर्चा आहे. तसं झालं तर काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. मतांमध्ये झालेल्या फुटीमुळे आघाडीतील बड्या नेत्यांचा पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केले जात आहेत. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी मात्र पुन्हा एकदा एकला चलोची भूमिका घेतली असल्याचं दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं वंचित बहूजन आघाडी भाजपची बी टीम असल्याची टीका केली होती. त्याचीच आठवण करुन देत आंबेडकर यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण आणि पुरावे मागितले आहेत. त्यामुळे यावरुन आंबडेकर यांनी काँग्रेसला अडचणीत पकडून एक प्रकारे स्वतंत्र निवडणूक लढवण्याचेच संकेत दिले असल्याची चर्चा आहे. अशातच आता काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे वंचित बहूजन आघाडीत गेले तर काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS