गोपीचंद पडळकर पक्ष बदलणार, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

गोपीचंद पडळकर पक्ष बदलणार, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

सोलापूर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहूजन आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातून वंचित बहुजन आघाडीत गेलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीतून पडळकर हे शेकापच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पडळकर हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख हे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक ते लढवणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघातून पडळकर यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं बोललं जात आहे. तसेच या मतदारसंघात धनगर समाजाची संख्या मोठी असल्यामुळे पडळकर यांची या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी आहे. परंतु वंचित बहुजन आघाडी की शेकापमधून निवडणूक लढवायची याबाबत ते विचार करत आहेत. याठिकाणी शेकापची ताकद मोठी असल्यामुळे पडळकर शेकापमध्ये जातील असं बोललं जात आहे. याबाबत पडळकर हे आमदार गणपतराव देशमुख यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS