राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला आमदार विधानपरिषदेत !

राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला आमदार विधानपरिषदेत !

नागपूर –विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे ११ जागांसाठी आता केवळ ११ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान भाजपच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या पहिल्याच आमदाराची विधानपरिषदेत एन्ट्री होणार आहे. रासपचे अध्यक्ष आणि पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला असून भाजपच्या पाठिंब्यामुळे ते या निवडणुकीत बिनविरोध निवडून येणार आहेत. इतिहासात रासपचा पहिलाच आमदार विधानपरिषदेत आला असून विधानसभेत पुण्यातील दौड येथील आमदार राहुल कुल हे रासपचे आमदार आहेत.

दरम्यान जानकर यांनी भाजपकडून अर्ज भरावा अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा होती. त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना अर्ज भरायला सांगितला होता. त्यामुळे जानकरांचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. भाजप काय निर्णय घेणार या विषयी उत्सुकता लागली होती. आता या निर्णयामुळे ती मावळली आहे. भाजपचे ४, शिवसेना, काँग्रेस यांचे प्रत्येकी २, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांचे प्रत्येकी १ उमेदवार रिंगणात आहेत.

 

COMMENTS