प्रचारातून मूळ मुद्दे बाजूला, आरोप-प्रत्यारोपात रंगले नेते

प्रचारातून मूळ मुद्दे बाजूला, आरोप-प्रत्यारोपात रंगले नेते

सातारा – सध्या राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त प्रचाराचा धुराळा उडत आहे. पण या प्रचारात विविध पक्ष व त्यांचे उमेदवारांकडून पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांपेक्षा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत मतदारांना भुलवण्याची रणनीती’ आखली जात आहे.

सध्या राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यावर आहे. यामध्ये पुणे, मराठावाडा, अमरावती, नागपूर मतदारसंघातील पदवीधऱ व शिक्षक मतदारसंघाची निवडणुक होत आहे. यात शिवसेना, काॅंग्रेस, राष्द्रवादी यांची महाविकास आघाडी विरुध्द भाजप यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार असली तरी बंडखोर उमेदवार, मनसे, वंचित बहुजन आघाडी, आणि एमआयएम या दोन्ही पक्षाने उमेदवार उभे केले असल्याने मतांचे जातीय ध्रुवीकरण आणि पसंती क्रमांक यावरून आता गणिते घातली आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष मात्र प्रचारात एकत्रित असल्याचा संदेश देण्यात आला. तर भाजपमध्ये उमेदवारीवरून गोंधळ असल्याचेच चित्र दिसून आले आहे.

करोना काळात सुरू असणारा प्रचार पदवीधरांऐवजी पक्षीय आरोप-प्रत्यारोपाचा अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु प्रचारातून प्रमुख मुद्देच गायब झाले आहे. पदवीधरांचे प्रश्न म्हणजे शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर यांच्यासह विविध व्यवसायातील पदवीधारकांचे प्रश्न असे मानले जाते. वास्तविक केद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने चर्चेत येतील किंवा आणले जातील असे अपेक्षित होते. महापोर्टलचा गोंधळ, शिक्षक अनुदानाचे प्रश्न, शिक्षक पात्रता परीक्षांचा खेळ असे विषय निवडणूक रणधुमाळीतून गायब आहेत. राजकीय टीका करण्यावरच प्रचारात भर आहे. या निवडणुकीसाठी अनेक जिल्ह्य़ातील मतदारसंघ असल्याने अधिक व्यापक संपर्क असणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत किती संख्येने घेऊन येतील, यावर बरीच गणिते ठरविण्याची शक्यता आहे.

 

COMMENTS