राज्यभरात मराठा आंदोलकांची धरपकड, विधानसभेत भडका !

राज्यभरात मराठा आंदोलकांची धरपकड, विधानसभेत भडका !

मुंबई – आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा भडका उडण्याची शक्यता आहे. आज मराठा आंदोलन मुंबईकडे कूच करणार होते. त्याआधीच रात्रीपासून सरकारने मराठा आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. अहमगनगरमध्ये संजीव भोर यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं. पुण्यात राजेंद्र कोंढरे, संतोष शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. तर कोल्हापुरातही अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे.

दरम्यान पोलिकांना गुंगारा देऊन आज अनेक ठिकाणाहून आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानावर ते आंदोलन करणार आहेत. सरकार केवळ आरक्षण देण्याचा दिखावा करत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. मराठा आंदोलकांच्या धरपकड प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले.  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणावरुन सरकारवर हल्लाबोल केला. शांततेत चाललेलं आंदोलन सरकार दडपण्याचा प्रय़त्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जोपर्य़ंत मराठा आणि धनगर आरक्षणाबाबतचा अहवाल सरकार सभागृहात मांडत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालु देणार नाही असा इशारा विखे पाटील यांनी दिला आहे. धनगर आणि मराठा आरक्षणाचा अहवाल सभागृहात मांडण्याऐवजी सरकार मराठा तरुणांची धरपकड का करत आहे ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. तर आज 26/11 आहे. आजचा दिवस संवेदनशील आहे. त्यामुळे 27 तारखेला आंदोलन करा असं आम्ही आंदोलकांना सांगितलं होतं. त्यामुळे आंदोलन दडपण्याचा प्रश्नच नाही असं स्पष्टीकरण चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान राज्य सरकार येत्या 28 नोव्हेंबर रोजी विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक मांडणार आहे. तसेच 29 नोव्हेंबर रोजी विधानपरिषदेत विधेयक मांडण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी याबाबत मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक पार पडली आहे. विधेयकाचे प्रारुप ठरवण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली असून आज संध्याकाळी पुन्हा होणार उपसमितीची बैठक पारड पडणार आहे.

याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मागास आयोगाचा अहवाल अधिवेशनात सादर होत नाही. आरक्षणाचे विधेयक आणायला सरकार तयार नाही. मराठा समाज या अस्वस्थतेतून मोर्चे काढत आहे. पोलिसांच्या बळावर मोर्चे थांबवून कार्यकर्त्यांना अटक करणं दुर्दैवी आहे. लोकशाही संपवून हुकुमशाही पद्धतीने फडणवीस सरकार चालत असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS