मतदान, तुम्ही कधीच न केलेलं, न पाहिलेलं, न ऐकलेलं, वाचा एका मतदानाची अफलातून गोष्ट !

मतदान, तुम्ही कधीच न केलेलं, न पाहिलेलं, न ऐकलेलं, वाचा एका मतदानाची अफलातून गोष्ट !

गोंदिया – मतदान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर राहतं ते लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्यसंस्था किंवा सोसायटी, सहकारी संस्था किंवा एखाद्या मोठ्या विषयावर परदेशामध्ये जनमत घेण्यासाठीही मतदान होतं. तुम्ही भारतात असाल तर 18 वर्ष पूर्ण झालेल्या बहुतेक व्यक्तींनी असं मतदान केलेलं असतं. त्यामुळे मतदान ही संकल्पना आपल्याला चांगलीच परिचयाची आहे. पण आपल्या गोंदिया जिल्ह्यात एक वेगळ्याच गोष्टीसाठी मतदान झालं. तम्ही ते वाचलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

त्याचं झालं असं, गोंदियातील देवरी गावतल्या बंग कटुंबात एक बाळ जन्माला आलं. मग त्याचं नाव काय ठेवायचं असा प्रश्न सगळ्यांसमोर होता ? घरातल्या वेगवेगळ्या सदस्यांनी वेगवेगळी नावं सुचवली. यक्ष, युवान आणि यौविक अशी तीन नाव घरातील सदस्यांनी सुचवली. मात्र त्यावर एकमत काय होईना. घरातील मंडळींना नाराज तर करायचं नाही. मग घरातील ज्येष्ठ सदस्यांनी त्यावर नामी शक्कल लढवली. या तीन नावांवर चक्क मतदान घेण्याचं ठरवलं. ज्या नावाला जास्त मते पडतील ते नाव फायनल करायचं असं ठऱलं.

मग मतदानाची तयारी झाली. गावातील सर्वांना या आगळ्यावेगळ्या मतदानाबद्दल कळवण्यात आलं. मतदानाची वेळ आणि ठिकाणही ठरलं. गावातील तबब्ल 192 सदस्यांनी या मतदानामध्ये आपला सहभाग नोंदवला. सर्वाधिक मते ही युवान या नावाला पडली. त्यामुळे त्या बाळाचं नाव युवान ठेवण्याचा निर्णय झाला. या आगळ्यावेगळ्या मतदानात भंडारा गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनीही सहभाग घेतला. या आगळ्यावेगळ्या मतदानाची जिल्हयात चर्चा सुरू आहे.

COMMENTS