वळसे पाटील फडणवीसांचा राग कसे करायचे शांत ?  मुख्यमंत्र्यांनी सांगितले दोन खास किस्से !

वळसे पाटील फडणवीसांचा राग कसे करायचे शांत ?  मुख्यमंत्र्यांनी सांगितले दोन खास किस्से !

मुंबई – विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या एक्सष्टीनिमित्त त्यांच्या सर्वपक्षीय सत्काराचा कार्यक्रम काल ठेवण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी वळसे पाटील यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांच्या भाषणात केला. यावेळी त्यांनी वळसे-पाटील विधानसभेचे अध्यक्ष असतानाच्या काही आठवणी सांगितल्या.

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना विदर्भाच्या प्रश्नावर तावातावाने बोलायचे. आक्रमक व्हायचे. त्यावेळी वळसे पाटील त्यांना शांत करण्याचा प्रय़त्न करत असत मात्र फडणवीसांचा आक्रमकपणा काही कमी होत नसे. त्यावेळी वळसे पाटील काहीतरी युक्त्या करुन फडणवीसांना शांत करत असत. वळसे पाटील म्हणत असत अहो फडणवीसजी तुम्हाला विदर्भाची खूप काळजी आहे हे खरं आहे. पण मलाही थोडीफार तरी विदर्भाची काळजी आहे. कारण मी विदर्भाचा जावई आहे. त्यावर फडणवीस शांत व्हायचे.

असेच एकदा सभागृहात देवेंद्र फडणवीस खूप रागारागाने बोलत होते. तेंव्हा वळसे पाटील यांनी त्यांना माणूस भूक लागल्यानंतर खूप चिडतो, त्यामुळे तुम्ही सभागृहाबाहेर जा आणि काहीतरी खाऊन या असं सांगितलं. फडणवीसांनी वळसेंचा तो सल्ला ऐकला आणि खाऊन पुन्हा आत आले तर एकदम त्यांच्यात फरक पडला होता. ते शांत झाले होते. त्यामुळे पुढे कधी असा चिडण्याचा प्रसंग आला तर मी सभागृहाबाहेर जाऊन खाऊन येत असे असा किस्साही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.

COMMENTS