पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ।

पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ।

नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे.प्रचार कालावधी कमी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. प्रचार कालावधी 20 तासांनी कमी केला आहे. त्यामुळे गुरूवारी रात्रीच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तसेच हिंसाचारासंबंधी कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यासही निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. 19 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे.

दरम्यान पश्चिम बंगालमधील निवडणुकांपूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक प्रचाराचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या दमदम, बरसात, बसीरहाट, जयनगर, मथुरापुर, जादवपुर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकाता या जागांवरील प्रचार गुरूवारी रात्री 10 वाजता संपणार असल्याची माहिती निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार यांनी दिली आहे.

तसेच देशात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाकडून कलम 324 चा वापर करण्यात आला आहे. या कलमाचा पहिल्यांदा वापर केला असला तरी शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यामध्ये हिंसाचार किंवा कायद्याच्या उल्लंघनासारखे प्रकार घडल्यास याचा पुन्हा वापर करण्यात येऊ शकतो, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट केले आले.

COMMENTS