पंकजा मुंडेंचा कार्यक्रम घेतला आणि युवा प्रदेशाध्यक्ष पद गेलं !

पंकजा मुंडेंचा कार्यक्रम घेतला आणि युवा प्रदेशाध्यक्ष पद गेलं !

बीड – बीडच्या पालकमंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा कार्यक्रम घेणं शिवसंग्राम पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षाला चांगलंच महागात पडलं आहे. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षातील युवा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेली काही दिवसांपासून त्यांची भाजपशी जवळीकता वाढली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पंकजा मुंडे यांचा एक कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमात त्यांच्या कार्यकर्त्यांनी बीडचा भावी आमदार कोण अशा घोषणा त्यांच्या बाजूने दिल्या होत्या. त्यामुळे पक्षनेतृत्वानं याची दखल घेत त्यांची थेट पक्षातूनच हकालपट्टी केली आहे.

दरम्यान गेली काही दिवसांपासून विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील दुरावा वाढत असल्याचं दिसून येत आहे. अशातच मस्के यांनी विकासकामांच्या उद्घाटनाला पंकजा मुंडे यांना बोलावून शक्ती प्रदर्शन केलं. याच कार्यक्रमात विनायक मेटे देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मस्के हे शिवसंग्राम सोडणार नसल्याची ग्वाही मेटे यांनी दिली होती. परंतु काही दिवसातच मस्के यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा कार्यक्रम घेतला आणि मस्केंचं युवा प्रदेशाध्यक्षपद गेलं असल्याची चर्चा सध्या बीडच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

COMMENTS