अशोक चव्हाण यांचं प्रदेशाध्यक्षपद कायम राहणार ?

अशोक चव्हाण यांचं प्रदेशाध्यक्षपद कायम राहणार ?

मुंबई – तब्बल 9 वर्षानंतर महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी बदलण्यात आले. मोहन प्रकाश यांच्या जागी कर्नाटकातील मल्लीकार्जुन खरगे यांची राज्याच्या काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही बदलतील अशी चर्चा होती. मात्र महापॉलिटिक्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक चव्हाण हे 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्ष कायम राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना आता विराम मिळण्याची शक्यता आहे.

मल्लीकार्जुन खरगे यांची पदभार स्विकारल्यानंतर काल दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश कार्यकारणीची बैठक झाली. त्यामध्ये राज्यातील सध्याची राजकीय स्थिती आणि आगामी काळातील पक्षाची संभाव्य वाटचाल याबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये प्रदेश काँग्रेस आक्रमक नसल्याची काही नेत्यांनी तक्रार केल्याची माहिती मिळत आहे. विशेष विदर्भातील नेत्यांनी अशी तक्रार केल्याचं कळतंय. मात्र नेतृत्वबदलाबाबत काहीही चर्चा झाली नसल्याची माहिती आहे.

अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाला निर्विवाद वर्चस्व मिळवून दिलं आहे. त्यानंतर झालेल्या छोट्यामोठ्या निवडणुकीतही पक्षाने ब-यापैकी कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर पक्ष चालवण्यासाठी लागणा-या सर्व बाबी, मुख्यमंत्री राहिल्यामुळे त्यांच्याकडे राज्याच्या कानाकोप-यात असणारा संपर्क आणि येत्या काळात आघाडी होणार असल्यामुळे त्याबाबत राष्ट्रवादी आणि इतर पक्षांशी चव्हाण यांचा असलेला समन्वय या बाजू त्यांच्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे काही तक्रारी असल्या तरी त्यांना सध्यातरी सक्षम पर्याय असल्याचं दिसून येत नाही.

राहुल गांधी यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून ते आपली टीम तयार करतील. राज्यातल्या नेतृत्वात बदल होईल अशी चर्चा होती. राजीव सातव यांच्याकडे प्रदेशाध्यक्षाची धुरा जाईल अशीही चर्चा होती. राजीव सातव हे टीम राहुल यांचे महत्वाचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा जाईल अशी शक्यता होती. मात्र सध्यातरी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राजीव सातव यांना काहीकाळ तरी या पदासाठी थांबावं अशीच चिन्हे आहेत.

COMMENTS