बारामती लोकसभा उमेदवारीबाबतचा महादेव जानकरांचा बार फुसका, भाजपकडून ‘यांना’ देणार उमेदवारी ?

बारामती लोकसभा उमेदवारीबाबतचा महादेव जानकरांचा बार फुसका, भाजपकडून ‘यांना’ देणार उमेदवारी ?

बारामती  बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आपण लढणार असल्याचं वक्तव्य रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अनेक वेळा केलं आहे. परंतु ही लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतचा महादेव जानकर यांचा बार फुसका झाला असल्याचं दिसत आहे. कारण महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जानकर यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी दानवे बारामतीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान 2014 मधील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट, महाराष्ट्रात निर्माण झालेला धनगर आरक्षणाचा प्रश्न यामुळे बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना विजयासाठी झगडावं लागल्याचं पहावयास मिळाले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या आघाडीकडून महादेव जानकर यांनी आव्हान दिलं होतं. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी महादेव जानकर यांचा 69 हजार 719 मतांनी पराभव केला होता.

परंतु आगामी बारामती लोकसभा निवडणूक लढवून सुप्रिया सुळे यांचा पराभव आपणच करणार असल्याचा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला आहे. मात्र जानकर यांच्या या वक्तव्याचा बार फुसकाच असल्याचं दिसून येत आहे. कारण त्यांच्याशी आमची याबाबत अद्याप चर्चाच झालेली नसल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

दानवे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीत जानकर यांच्याऐवजी दुस-या चेह-यालाही संधी दिली जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि  दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते.

विजय शिवतारे

2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत करत लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली होती. मात्र महाआघाडीच्या वाटाघाटीत ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्याने विजय शिवतारे यांना माघार घ्यावी लागली. आता मात्र पुन्हा एकदा त्यांनी लोकसभा लढवण्याची मानसिकता ठेवली आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार का हे पाहणं करजेचं आहे.

 

सौ. कांचन राहुल कुल

 

दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल अशी चर्चा मागील काही दिवसात होत आहे. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील असून त्या पवार कुटुंबीयांच्या नात्यातील आहेत.  याचा फायदा कुल यांना होऊ शकतो त्यामुळे भाजप त्यांना उमेदवारी देणार का हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS