“बीडमध्ये विजयी झालेल्यांची मेहनत जेवढी आहे त्यापेक्षा जास्त पराभूत उमेदवारांचा ओव्हरकॉन्फिडन्स!”

“बीडमध्ये विजयी झालेल्यांची मेहनत जेवढी आहे त्यापेक्षा जास्त पराभूत उमेदवारांचा ओव्हरकॉन्फिडन्स!”

बीड – काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत बीड जिल्ह्यातील निवडणूक चांगलीच गाजली. याच निवडणुकीवर ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत रुईकर यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.

लक्ष्मीकांत रुईकर यांची फेसबुक पोस्ट

राजकारण असो की युद्ध एक नियम पाळावाच लागतो नव्हे पाळायलाच हवा अन तो म्हणजे समोरच्याला कधी अंडर इस्टिमेट करू नका अन ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नका,नेमकं बीड असो की आष्टी अथवा परळी,तिन्ही ठिकाणी हेच झालं .आपला प्रतिस्पर्धी हा ताकदवान आहे किंवा टक्कर देऊ शकतो याकडे दुर्लक्ष करून आपणच किती बलाढ्य आहोत हे बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला .अन त्याची परिनिती धक्कादायक पराभवात झाली. या तिन्ही निकालाकडे पाहिल्यास विजयी झालेल्यांची मेहनत जेवढी आहे त्यापेक्षा जास्त पराभूत उमेदवारांचा ओव्हरकॉन्फिडन्स महत्वाचा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

2019 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले अन भाजप शिवसेनेच्या नेत्यांचे हात स्वर्गाला टेकले .आता महाराष्ट्र एकहाती सत्ता देणार या अभिनिवेषात हे सगळे नेते हवेत राहिले .
पन्नास वर्षापेक्षा जास्त काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणाची नस ना नस माहीत असणारा शरद पवार नावाचा माणूस समोर आहे याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला अन धक्कादायक निकाल हाती आले.

बीड जिल्ह्याचा विचार केला तर हा जिल्हा स्व गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो .राज्यात सत्ता कोणाचीही असो जिल्ह्यात मुंडे म्हणतील अन ठरवतील तोच आमदार खासदार होणार हे ठरलेले होते .मात्र मुंडेंच्या माघारी त्यांचा करिष्मा कायम ठेवण्यात फारसे यश आले नाही .2014 ला भाजपचे पाच आमदार विजयी झाले मात्र पाच वर्षात हे यश कायम टिकवण्यात नेतृत्वाला अपयश आले .स्वतःसोबतच चार जागा महायुतीच्या पंकजा मुंडे यांनी गमावल्या .
राज्यात ज्या दोन लढतीकडे राजकीय धुरीणांचे लक्ष होते त्या म्हणजे बीड आणि परळी.आणि या दोन्ही ठिकाणचे जे निकाल लागले ते सर्वांना धक्का देणारे होते .या निकालांचा अन्वयार्थ लावायचा म्हणल्यास एकच वाक्य पुरेसे आहे आणि ते म्हणजे ओव्हरकॉन्फिडन्स आणि ओव्हरकॉन्फिडन्स.

पंकजा मुंडे यांना ओव्हरकॉन्फिडन्स होता की नाही माहीत नाही पण त्यांनी ग्राउंड रियालिटी अन ग्राउंड रिपोर्टकडे सपशेल दुर्लक्ष केले .धनंजय मुंडे हे चार वर्षांपासून परळीत नेटवर्क लावण्यात व्यस्त होते तर पंकजा मुंडे मात्र लोकांपर्यंत पोहचण्यात कमी पडत होत्या .लोकसंपर्क हा राजकीय नेत्यांचा कमालीचा महत्वाचा गुण आहे याचा विसर त्यांना पडला असावा अन धनंजय यांनी मात्र दांडगा लोकसंपर्क ठेवण्यात यश मिळवले .त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला अन धनंजय यांनी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या लढतीत सहज अन मोठा विजय मिळवला .निवडणूक कोणतीही असो तुमचं होमवर्क व्यवस्थित पाहिजे हा वस्तुपाठच या निमित्तानं धनंजय मुंडे यांनी घालून दिला .पंकजा मुंडे या राज्यभर प्रचार करीत असताना धनंजय यांनी मात्र ग्राउंड पक्के करून राज्यात प्रचार केला,कुठेही प्रचार केला तरी त्यांचे परळीतील घटना घडामोडींवर बारीक लक्ष होत,दुसरीकडं पंकजा मुंडे या देखील लक्ष ठेवून होत्या मात्र यंत्रणा ज्यांच्याकडे होती ते सगळे ताई आल्यावर पुढे पुढे करणारे खुसमस्करे जमा झाल्याने त्यांचा ग्राउंडशी संपर्कच राहिला नाही .याचा व्हायचा तोच परिणाम झाला अन जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा वेळ निघून गेलेली होती .

बीडच्या बाबतीत सुद्धा हेच झाले,चार वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी खाली काय चालले आहे याकडे लक्षच दिले नाही .अन सेनेत जाऊन मंत्रिपद मिळवल्यानंतर देखील त्यांचा बहुतांश वेळा हा मुंबईतच गेला,त्या काळात म्हणजे लोकसभा निकालानंतर संदिप ने मात्र डोअर टू डोअर जात लोकांशी थेट संपर्क वाढवला,दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर हे मात्र मुंबई,औरंगाबाद आणि कधी कधी पर्यटनाला आल्यासारखे ते बीडला धावती भेट द्यायचे .नगर पालिका असो की पंचायत समिती अथवा इतर संस्था यामध्ये नेमकं काय सुरू आहे,लोकांची भावना काय आहे,जनभावना काय म्हणते आहे ,याचा कधी त्यांनी विचारच केला नाही .जयदत्त क्षीरसागर यांना ठराविक लोकांनी घेरल्यामुळे लोकांशी असलेली नाळ तुटली अन दुसऱ्या फळीतील नेत्यांनी बिडकरांना गृहीत धरले .अमका एरिया आपलंच आहे,हा समाज आपल्याशिवाय जाऊच शकत नाही,व्यापाऱ्याच्या महत्वाच्या लोकांना सांगितले की सगळे सोबत येतात,शहरात जरी असुविधा असली तरी एका रात्रीत रोड करू अन मत मिळवू,बाहेरून आणलेले मतदार आपलेच आहेत,ग्रामीण भाग आपल्या पाठीशी आहे या आणि अशा सगळ्या भ्रमात जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे सहकारी राहिले .

गेल्या चार वर्षात विकासाच्या नावाखाली बीड शहराचे जे वाटोळे झाले आहे ते लोकांना खटकत होते पण समोर बोलून का दुश्मनी घ्यायची असा विचार लोकांनी केला .प्रभाग अकरा मधून ट्रेलर देखील दाखवला मात्र मोठ्या क्षीरसागर यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं किंवा सब कुछ अलबेल है असा भास त्यांच्या समोर निर्माण केला गेला .नगर पालिकेसारखी संस्था ताब्यात असल्यावर होत्याच नव्हतं होत हे बीडमध्ये दिसलं तर तीच नगरपालिका नव्हत्याच होत करू शकते हे परलीमध्ये स्पष्टपणे जाणवलं .दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांनी मात्र गढूळ पाण्याचा होणारा पुरवठा,रस्त्याची अर्धवट कामे,शहरातील तुंबलेल्या गटारी,नगर पालिकेचा बोगस अन भ्रष्ट कारभार हे विषय घेऊन थेट लोकांच्या घरात पोहचले अन इथं त्यांन लोकांच्या काळजाला हात घातला .तीस वर्षांपासून ताब्यात असणार शहर नेहमीच का मायनस जात याचा अभ्यास कदाचित सत्ताधारी करीत नसावेत अन त्यांचे कच्चे दुवे संदीपने हेरले असावेत त्यामुळे दहा हजारापेक्षा जास्त मताधिक्य संदीप ला शहरातून मिळालं .त्याचा डोअर तू डोअर प्रचार,संदीप म्हणजे आपण आमदार अस समजून जीवाच रान करणारी टीम ,हात दाखवा अन गाडी थांबवा ही इमेज ह्यामुळे संदीप महिला असोत की तरुण अथवा विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये लोकप्रिय झाला अन मोठया क्षीरसागर यांनी त्याला चिल्लर समजले अन स्वतःच्या पायावर धोंडा पडून घेतला .क्षीरसागर यांच्या पराभवाला धाकल्या क्षीरसागर यांचा कारभार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे मात्र विरोधकांच्या कच्या दुव्याच संधी समजून सोन करण्याचं जे काम संदीप ने केलं ते कौतुकास्पद आहे .भलेभले दिग्गज अन राजकीय पंडित जयदत्त क्षीरसागर यांच्या विजयाची खात्री देत होते मात्र संदीपसोबत असलेली टिम, प्रचंड इच्छाशक्ती,नेटके नियोजन,दांडगा जनसंपर्क, शेवटच्या क्षणापर्यंत विजय आपलंच आहे हा विश्वास यामुळे थोरल्या क्षीरसागर यांचा बुरुज ढासळला.

बीड परळी सारख आष्टी मध्ये देखील विद्यमान आमदार भीमराव धोंडे हे बिनधास्त राहिले,लोकसभेत मिळालेली 70 हजाराची लीड तुटली तरी अर्ध्यावर येईल मात्र समोरचा पहिलवान पक्का नाही त्यामुळे ते खुशालचेंडू सारखे वागले आणि नेमकं इथंच त्यांचा घात झाला .आता कटप्पा कोण अन बाहुबली कोण या चर्चा करण्यात काही मतलब नाही .धोंडे हे लोकांना भेटत नाहीत,सहा वाजताच त्यांच्या घराची दार बंद होतात,अनेक गावांत ते गेलेच नाहीत,लोकांचे फोन घेत नाहीत,ठेविले अनंते तैसेचि रहावे अस वागतात या त्यांच्या बद्दलच्या चर्चा मतदारांनी खऱ्या करून दाखवल्या अन ते उमेदवारी नको नको म्हणणाऱ्या बाळासाहेब आजबे सारख्या उमेदवाराकडून सपाटून पडले .इथदेखील धोंडे यांचा जनसंपर्क कमी पडला हे विशेष,शेवटपर्यंत ते लोकांमध्ये मिसळले नाहीत ही वस्तुस्थिती आहे अन त्यामुळेच त्यांचा पराभव झाला .

एकूणच बीड जिल्ह्याचा विचार केला तर गेवराई असो कि परळी अथवा बीड या सर्वच ठिकाणी शहराने ज्यांच्या पारड्यात माप टाकले त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे,आणि यावरून तुम्ही लोकांच्या अडीअडचणीच्या काळात किती धावून जातात यावर तुमच्या जय पराजयाच गणित अवलंबून असते हे नक्की .ज्यांचा विजय झाला ते बहुतांश लोकप्रतिनिधी हे डाऊन टू अर्थ अशा पद्धतिने वागणारे होते हे नाकारून चालणार नाही .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड,

COMMENTS