राज्यातील आणखी एका भाजप आमदाराला कोरोनाची लागण!

राज्यातील आणखी एका भाजप आमदाराला कोरोनाची लागण!

मुंबई – राज्यातील आणखी एका भाजप आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या कुटुंबियांची कोरोना चाचणी मात्र निगेटीव्ह आली आहे. सोमवारी कुल यांची कोरोना टेस्ट पाॅझीटीव्ह आली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. महेश लांडगे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. चिंचवड- थेरगाव येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आमदार लांडगे यांच्याकडे पक्षाचे शहराध्यक्षपद असल्यामुळे अनेकांशी त्यांचा संपर्क येत असतो. आमदार लांडगे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यात आयुक्तांच्या दालनात बैठक झाली होती. त्यापूर्ची दोन दिवस अगोदरही आमदार लांडगे महापालिकेत आले होते. त्यावेळी त्यांनी आयुक्त व अन्य अधिकारी, पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला होता. शिवाय, आमदार लांडगे यांच्या भोसरी येथील संपर्क कार्यालयात अनेक जण कामानिमित्त येतात. त्यामुळे त्यांना कोरोना कसा आणि कुठे झाला याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

तसेच काही दिवसांपूर्वीच भाजपचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह त्यांची पत्नी आणि यशराज व विराज ही दोन्ही मुले आणि भाऊ चेतन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर बिबवेवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS