अमरावतीत काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे आव्हान, ‘या’ नावांची चर्चा !

अमरावतीत काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे आव्हान, ‘या’ नावांची चर्चा !

अमरावती – अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान असल्याचं दिसत आहे. निवडणूक तोंडावर आली असता काँग्रेसकडून उमेदवाराची निवड न झाल्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तसेच या निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांपैकी कुणी उत्सुक नसल्याचं दिसून येत असून ही काँग्रेससमोर मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे नवख्या उमेदवाराला यावेळी संधी देण्याचे धक्कातंत्र अवलंबिल्या जाण्याची शक्यता असून या निवडणुकीसाठी स्थानिक उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया यांच्यापासून ते नगरसेवक बबलू शेखावत यांच्यापर्यंत अनेकांची नावे चर्चेला आली आहेत. पण सद्य:स्थितीत स्वीकृत नगरसेवक अनिल माधोगडिया यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. माधोगडिया हे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या गटाचे मानले जातात. अनेक इच्छुकांना बाजूला सारून त्यांना स्वीकृत नगरसेवक मिळाल्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्यदेखील व्यक्त झाले होते.

दरम्यान गेल्या सहा वर्षांमध्ये संख्याबळ वाढल्याने भाजपसाठी ही निवडणूक सहजसाध्य वाटत आहे. जिल्हय़ाचे पालकमंत्री प्रवीण पोटे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची त्यांनी तयारी केली असल्याचं बोललं जात आहे. पुढच्या महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवीण पोटे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा वेग वाढवला आहे. प्रवीण पोटे यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा ३८ मतांनी पराभव केला होता. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अजय नावंदर यांच्यामुळे येथे तिरंगी लढत झाली होती.

 भाजपकडे सर्वाधिक सदस्यसंख्या

 याठिकाणी भाजपचं पारडं मजबूत असल्याचं पहावयास मिळत असून सध्या मतदारांपैकी भाजपकडे सर्वाधिक १९० सदस्य, काँग्रेसचे १३७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २९ तर शिवसेनेचे २९ सदस्य आहेत. इतर सदस्यांमध्ये प्रहार, युवा स्वाभिमान, एमआयएम, इतर राजकीय पक्ष आणि अपक्ष सदस्यांचा समावेश असून  या वेळी चार नगरपंचायतींच्या ६८ सदस्यांसह मतदारांची संख्या ३९७ वरून ४६५ वर पोहोचली आहे.

 

COMMENTS