सुरक्षा कपातीमुळे सेना-भाजपमध्ये सामना

सुरक्षा कपातीमुळे सेना-भाजपमध्ये सामना

मुंबई – महाविकास आघाडी राज्य सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, राज ठाकरे तसेच इतर भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर आता सरकरावर टीका होत आहे. भाजपचे नेते आशिष शेलार, नितीन राणे आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार म्हणाले, “नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्याचं आणि कोकणाचं नेतृत्व केलंय. त्यांना पुरवलेली सुरक्षा काढून घेतली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना सुरक्षा देण्यात आली आहे. हा माजी मुख्यमंत्र्यांसोबत केलेला दुर्व्यवहार आहे. यापूर्वी राज्यात असं कधीही घडलं नाही,” असं शेलार बोलले.

दरम्यान, नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली. “राज्य सरकारने माझी सुरक्षा कालच काढली. मला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. अतिरेक्यांपासून माझ्या जीवाला धोका असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली होती. पण राज्य सरकारने माझ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. त्यामुळे जर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज सरकार जबाबदार असेल”.

दरम्यान, सरकारने राज्य सरकारमधील काही मंत्री, त्यांचे कुटुंबिय यांच्यासह युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई) यांना एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. त्यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला.

नितेश राणे म्हणाले,“सरदेसाईंच्या मुलाला सुरक्षा देऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचं आणि योग्य पाऊल उचललं आहे. त्याला जास्त सुरक्षेची नितांत गरज होती. कारण त्याने मंत्रालयातील अनेक फाईल्स दाबून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक नोकरशाह त्याच्यावर नाराज आणि संतापलेले आहे. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची खऱ्या अर्थाने गरज होती”, असं ट्वीट करत नितेश राणे यांनी सरकारच्या सुरक्षाव्यवस्थेतील बदलांवरुन टीका केली आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही वरुण सरदेसाई यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. कोरोना काळातील राज्य सरकारची मोहीम असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वरुन देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.

COMMENTS