‘त्या’ तरुणीवरील अत्याचाराची मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल, कारवाईचे पोलिसांना निर्देश !

‘त्या’ तरुणीवरील अत्याचाराची मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल, कारवाईचे पोलिसांना निर्देश !

बीड – नांदेड जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणीवर ऍसिड व पेट्रोल टाकून जाळल्यानंतर काही तासांनी रुग्णालयात त्या तरुणीचा मृत्यू झाला. हा प्रकार संतापजनक असून बीड जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, तातडीने आरोपींना अटक करावी तसेच कठोर कारवाई करण्यात यावी असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा पोलिसांना दिले आहेत.

याबाबतो मुंडे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. पुणे येथे वास्तव्यास असलेल्या व मूळच्या नांदेड जिल्ह्यातील असलेल्या २२ वर्षीय तरुणीला पुणे ते नांदेड प्रवास करत असताना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोबतच्याच संशयित आरोपींनी आधी ऍसिड टाकून व नंतर पेट्रोल टाकून जाळले. आज (दि. १५) रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबद्दल मुंडे यांनी दुःख व संताप व्यक्त केला असून, बीड पोलीस तातडीने आरोपीला गजाआड करण्यात यशस्वी होतील, तसेच संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान लिव्ह इनमध्ये राहात असलेल्या प्रियकराने प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला केला. तसेच तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवल्याची घटना बीडमध्ये घडली होती. जखमी तरुणीला बीडच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिचा आज उपचारांदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेतील आरोपी अविनाश राजूरे याला नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधील आदमपूर येथील एका ढाब्यावरुन अटक करण्यात आली आहे. देगलूर पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपीला बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पुणे येथे राहत असलेले दोन प्रेमी युगल शनिवारी गावाकडे जात होते. मात्र, बीडच्या येळम्ब परिसरात दोघात वाद झाला आणि रागाच्या भरात प्रियकराने चक्क प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला केला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली. जखमी प्रेयसीला बीडच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आज तिचा मृत्यू झाला. मृत पीडिता ही नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील रहिवासी आहे. त्याच गावातील अविनाश राजूरे याच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून ती पुण्यात लिव्ह इनमध्ये राहत होती.

COMMENTS