खडसेंना ईडीची नोटीस, आता सीडीच्या धमाक्याची प्रतिक्षा

खडसेंना ईडीची नोटीस, आता सीडीच्या धमाक्याची प्रतिक्षा

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली असल्याचे माहिती समोर आली आहे. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत असताना खडसे यांनी माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशाराही भाजपला इशारा दिला होता. त्यामुळे आता ईडीची नोटीस आल्यावर खडसे सीडी लावून धमाका करणार का?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजप सरकारच्या काळात महसूलमंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी गंभीर आरोप झाले होते. याच प्रकरणातून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ईडी मार्फत याच प्रकरणात खडसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे किंवा कोणते अन्य प्रकरण आहे, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. ईडीने बजावलेल्या नोटीसनुसार खडसे यांना ३० डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्याकडे ईडीच्या नोटीसबाबत माध्यमांनी विचारणा केली असता अशी कोणतीही नोटीस आपल्याला अद्याप मिळाली नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले आहे. नोटीस मिळाल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन असे त्यांनी सांगितले.

COMMENTS