फडणवीसांच्या जागी गिरीश महाजनांच्या गळ्यात पडणार मुख्यमंत्रीपदाची माळ ?

फडणवीसांच्या जागी गिरीश महाजनांच्या गळ्यात पडणार मुख्यमंत्रीपदाची माळ ?

जळगाव – लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. अशातच जळगावात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर गिरीश महाजन हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचा दावा महाजन समर्थकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी ‘महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातही खांदेपालटाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत.

दरम्यान मोदींच्या जवळचे मानले जाणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या जागी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते, असा विश्वास महाजन यांच्या समर्थकांना आहे. हीच शक्यता गृहीत धरून गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी शहरात, महाजन यांना महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. या विषयाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महाजनांच्या समर्थकांचा हा विश्वास खरा ठरणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS