राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यात दोन नंबरचा पक्ष !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यात दोन नंबरचा पक्ष !

मुंबई – विधानसभा निवडणुकीचा निकाल कालच लागला. या निवड‌णुकीत भाजप हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असला तरी त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. या निकालावरुन राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना दोन, राष्ट्रवादी तीन आणि काँग्रेस चार नंबरचा पक्ष ठरला आहे. परंतु मतांचा विचार केला असता राष्ट्रवादीनं शिवसेनेलाही मागे टाकलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी दोन नंबरचा पक्ष ठरला आहे.

दरम्यान या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. भाजपला 25.75 टक्के मतं मिळाली आहेत. म्हणजेच 1 कोटी 41 लाख 99 हजार 348 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी हा मतांच्या संख्येत दोन नंबरचा पक्ष ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 16.71% म्हणजेच 92 लाख 16 हजार 911 मतं मिळाली आहेत. तर शिवसेना हा तीन नंबरचा पक्ष ठरला असून यामध्ये शिवसेनेला 16.41% म्हणजेच 90 लाख 49 हजार 789 मत पडली आहेत. तर काँग्रेस हा चौथा पक्ष ठरला असून काँग्रेसला 15.87 टक्के म्हणजेच 87 लाख 52 हजार 199 मतं पडली आहेत. यावरुन राज्यातील जनतेनं भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सर्वाधिक मतं दिली असल्याची दिसत आहे.

COMMENTS