परळीत ‘वन रूफ हॉस्पिटल’ सुरू करणे विचाराधीन, धनंजय मुंडे यांनी घेतली डॉक्टर प्रतिनिधींची बैठक !

परळीत ‘वन रूफ हॉस्पिटल’ सुरू करणे विचाराधीन, धनंजय मुंडे यांनी घेतली डॉक्टर प्रतिनिधींची बैठक !

परळी – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परळी येथे वन रूफ हॉस्पिटल अर्थात सर्व वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी, ही संकल्पना राबवणे विचाराधीन असून, त्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी येथील डॉक्टर प्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा केली.

यावेळी सर्व परिस्थिती व सुविधांचा आढावा घेऊन ‘वन रूफ हॉस्पिटल’ सुरू करण्याच्या बाबतीत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे मुंडे यांनी सांगितले.

या बैठकीत लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर मंडळींना येत असलेल्या विविध समस्यांबद्दलही व्यापक चर्चा झाली. डॉक्टर्सना सेवेदरम्यान लागणारे पीईपी किटसह अन्य वैद्यकीय साहित्याबद्दल यावेळी डॉक्टर्सनी मुंडे यांना सविस्तर माहिती दिली.

या बैठकीत परळी शहर व ग्रामीण भागातील आरोग्यविषयक समस्या व उपाययोजनांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मुंडे यांच्यासह रा. कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, डॉ. सूर्यकांत मुंडे, डॉ. मधुसूदन काळे, डॉ. अजित केंद्रे, डॉ. संतोष मुंडे, डॉ. अजय मुंडे, डॉ. विजय रांदड यांसह आदी उपस्थित होते. या बैठकीसाठी मुंडे यांच्यासहित सर्वांनी विशिष्ट अंतरावर बसून ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियमही पाळल्याचे दिसून आले.

COMMENTS