पहाटे 2 वाजता अचानक भेट देणाय्रा आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांची झोप उडवली !

पहाटे 2 वाजता अचानक भेट देणाय्रा आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांची झोप उडवली !

मुंबई – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी पहाटे 2 वाजता मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. त्यामुळे काही रुग्णालयांची आता चांगलीच झोप उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. परंतु अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य केलं जात नाही. त्यामुळे याची दखल घेत स्वत: आरोग्यमंत्र्यांनी मंगळवारी पहाटे 2 वाजेपर्यंत रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेतली.

या भेटीदरम्यान आरोग्यमंत्र्यांनी चार रुग्णालयांना भेट दिली. या भेटीमध्ये चारही रुग्णालयांमध्ये काही बाबींची अपूर्णता आढळून आल्याने राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
यानंतर रुग्णांना दिलेल्या खाटांची अचूक माहिती रुग्णालय प्रशासनाने जाहीर फलकावर द्यावी. राज्य शासनाच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे, असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी संबंधित खासगी रुग्णालयांना दिला आहे.

80 टक्के खाटा राखीव करुनही रुग्णांना खाटा नाकारण्याचे किंवा बेड फुल झाल्याचे कारण खासगी रुग्णालयांकडून दिले जाते. यासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी येत असून त्याची दखल स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली.

यानंतर सोमवारी रात्री 10 च्या सुमारास आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना भेट देण्याचे मिशन हाती घेतलं. त्यांच्यासोबत राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे देखील होते. सुरुवातीला त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलला भेट दिली. तेथे खाटांच्या उपलब्धतेबाबत जाहीर फलक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी जसलोक, हिंदुजा, लिलावती या रुग्णालयांनाही भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी राखीव खाटांची माहिती दर्शविणारा तक्ता पाहिला.
काही रुग्णालयांमध्ये बेडच्या उपलब्धतेबाबत आणि दिलेल्या बेडबाबत माहिती दर्शविणारे फलक नव्हते.

शासनाने उपाचारासाठी जे दर निश्चित केले आहेत ते दरपत्रक लावण्यात आलेले नव्हते. क्षमतेच्या 50 टक्के खाटांचा वापर न करताही अनेक रुग्णांना प्रतिक्षा करावी लागत आहे, अशा विविध बाबी या भेटी दरम्यान निदर्शनास आल्या. त्यामुळे राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी केलेल्या नियमांचे पालन न केल्याने डॉ. सुधाकर शिंदे यांनी या बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, लिलावती हॉस्पिटल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

COMMENTS