राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार, शरद पवारांसोबतच्या भेटीत काय झाली झाली चर्चा? वाचा सविस्तर

राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार, शरद पवारांसोबतच्या भेटीत काय झाली झाली चर्चा? वाचा सविस्तर

पुणे – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शेट्टी यांनी शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या
निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राजू शेट्टी हे विधान परिषदेवर जाणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आज शेट्टी यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजू शेट्टी हे विधान परिषदेवर जाणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा आमदारकीचा प्रस्ताव मान्य केला आहे. आज खुद्द पवार यांनी बारामती पंचक्रोशीतील विविध शेतीचे प्रयोग, कृषी विज्ञान केंद्र, सेंटर ऑफ एक्स्लेन्स याची माहिती शेट्टी यांना दिली. जवळपास अडीच तासांहून अधिक काळ पवार यांनी स्वतःच्या गाडीतून शेट्टी यांना फिरवत या परिसरात सुरु असलेल्या नवीन शेतीच्या प्रयोगांबाबत स्वतः माहिती दिली. त्यामुळे आता पवार व शेट्टी यांचे मैत्रीपर्व नव्याने सुरु झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

या भेटीनंतर शरद पवार यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. ती खालीलप्रमाणे…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह आज बारामतीतील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रकल्पांना भेट दिली. देशी गोवंश अनुवंश सुधार प्रकल्प हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी गिर, साहिवाल, खिलार, पंढरपुरी, मुर्रा म्हैस या देशी जनावरांसंबंधी संशोधन कार्य येथे होतं.

ट्रस्टने राष्ट्रीय कृषी योजना आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांनी उभारलेल्या डेअरी प्रकल्पामार्फत दुधाची, रक्ताची तपासणी, चाऱ्याची तपासणी तसंच पशुपालनाचं प्रशिक्षण दिलं जातं. शेण, गोमूत्र आणि दुधावर मूल्य संवर्धन प्रक्रिया केंद्रही येथे उभारलं जात आहे.

नेदरलँडच्या तंत्रज्ञानावर आधारलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रालाही आम्ही भेट दिली. ही उत्तम वाणाची रोगप्रतिकारशक्ती असलेली भाजीपाल्याची रोपं ना नफा ना तोट तत्त्वावर शेतकऱ्यांना विकली जातात. या रोपांमार्फत अधिक उत्पादन काढण्यासंबंधी कन्सल्टन्सीही येथे केली जाते.

एवढंच नाही तर झालेल्या उत्पादनाचं ग्रेडिंग करून निर्यात वा स्थानिक बाजारपेठेत विक्रीव्यवस्थेचं मार्गदर्शनही केलं जातं. राज्यभरातील शेतकरी इथल्या प्रशिक्षणाचा लाभ घेतात.

ब्राझिलच्या जातीपासून एम्ब्रियोमार्फत तयार केलेल्या कालवड प्रकल्पालाही भेट दिली. तसंच नेदरलँडशी सामंजस्य करार असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासक्रम राबवणाऱ्या ॲग्रीकल्चरल कॉलेजलाही भेट दिली.

त्याचप्रमाणे नीती आयोगामार्फतच्या इनोव्हेशन सेंटरच्या प्रकल्पाची माहिती घेतली. फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन व कृषी क्षेत्रातले नवउद्योजक यांना या सेंटरमार्फत मार्गदर्शन केलं जातं.

COMMENTS