शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याचे अण्णांना साकडे

शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याचे अण्णांना साकडे

अहमदनगर – तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर सुरू असलेले आंदोलन २५ व्या दिवशीही सुरूच होते. कृषी कायद्यांविरोधात सर्व ठिकाणी सोमवारी शेतकरी साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, या मागणीसाठी आंदोलनातील शेतकऱ्यांनी रविवारी राळेगणसिद्धीत येत थाळीनाद आंदोलन केले. दिल्लीत आंदोलनास जागा मिळाल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करू, हे आपले शेवटचे आंदोलन असेल, असे हजारे यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांचे समाधान झाले.

कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाची पुढील दहा दिवसांची रूपरेषा जाहीर करण्यात आली. शेतकरी नेत्यांनी सांगितले की, कायद्यांविरोधात सर्व ठिकाणी सोमवारी शेतकरी साखळी उपोषणास सुरुवात करतील. विरोध दर्शवत २३ डिसेंबरला शेतकरी दिवस साजरा केला जाईल. आतापर्यंत ३३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत श्री गुरू तेगबहादूरजी यांचा शहीद दिवस पाळण्यात आला.

सरकार मुद्दाम उशीर करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष मंजितसिंह राय यांनी सांगितले की, सरकारसोबत अनेक टप्प्यात चर्चा होऊनही त्यांची भूमिका बदललेली नाही. या प्रकरणात ते मुद्दाम उशीर करत आहेत. कडक थंडीसोबतच वयस्करांच्या अडचणीतही वाढ होत आहे. ते म्हणाले की, हे एका राज्याचे आंदोलन नाही. त्याला देशभरातून पाठिंबा मिळतोय. दरम्यान, कायद्याची प्रादेशिक भाषांमध्ये केंद्राकडून माहिती देण्यात येणार आहे

COMMENTS