पुण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेच ठरलं

पुण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेच ठरलं

पुणे : सध्या राज्यात आगामी महापालिका निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याची पक्षाचे नेते वारंवार घोषणा करीत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल, अशी सावध भूमिका मांडत आहेत. अशावेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुणे महानगरपालिकेच्या अनुशंगाने मोठी घोषणा केली.

राऊत यांनी पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील, अशी घोषणा केली आहे. ते पुण्यात बोलत होते. पुणे महापालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. तर, काँग्रेसला सोबत घेण्याचा विचार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं. एकत्र लढणं हे सत्ता परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले पाऊल असेल. राज्यात महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढाव्यात, यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेत ज्या पक्षाची ताकद आहे, त्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी करावी असा विचार करण्यात येईल. निवडणुका एकत्र कशा लढता येतील यावर आम्ही अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकत्र निवडणूक लढली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. सत्ता काबीज करण्यासाठी मदत होईल, असंही राऊत म्हणाले.

“जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे आमच्या विरुद्ध तीन तीन पैलवान एकत्र आले, तरी आम्हीच पुण्याची महापालिका जिंकू याबद्दल माझ्या मनात शंका नाही,” असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

COMMENTS