सिनेमा लोकसभा निवडणुकीचा, टीव्ही9 चे पत्रकार संतोष गोरे यांचा ब्लॉग !

सिनेमा लोकसभा निवडणुकीचा, टीव्ही9 चे पत्रकार संतोष गोरे यांचा ब्लॉग !

मुंबई – लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी भाजपनं आधार घेतलाय तो गांधी कुटुंबावर टीका करण्याचा. तर शिवसेनेला आजही ‘ठाकरे’ या करिश्माई नावाशिवाय इतर पर्याय नसल्याचं या सिनेमाच्या ट्रेलरवरून स्पष्ट होतं. एकंदरीतच निवडणुकीच्या आधी मतांसाठी हे सिनेमे तयार केलेत का ? असा प्रश्न निर्माण होतो.

2019च्या जानेवारी महिन्यात ‘ठाकरे’, द ऍक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर आणि एनटीआर हे तीन सिनेमा प्रदर्शित होत आहेत. या तिन्ही सिनेमात राजकीय व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या आहेत. मात्र ‘ठाकरे’ आणि ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर’ वादाच्या भोव-यात अडकलेत.

लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच हे सिनेमा प्रदर्शित करण्याचं टायमिंग साधण्यात आलं आहे. आगामी लोकसभा निवडणुका सत्ताधा-यांसाठी सोप्या नाहीत. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंच्या करिश्म्यावर अवलंबून आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना पक्ष त्यांच्याच करिश्म्यावर वाटचाल करत होता. मात्र आता बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण शिवसेनेची भिस्त अजूनही बाळासाहेब ठाकरेंवरच आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी ‘ठाकरे’ सिनेमा प्रदर्शित करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याची ही खेळी आहे, हे उघड गुपित आहे. या सिनेमात मराठी मतदार आणि हिंदूत्ववादी मतदार यांना आवडतील अशा डायलॉगचा भडिमार करण्यात आला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे वादळ. “वादळ असताना शांत राहयाचं असतं, आणि बाहेर शांतता असताना वादळ निर्माण करायचं असतं”, हे बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य. पण शिवसेनाप्रमुखांचं हे वक्तव्य ते हयात नसले तरी तितकंच सत्य ठरलंय. आणि तेही त्यांच्याच आडनावानं त्यांच्यावर निघालेल्या सिनेमाच्या निमित्तानं.’ठाकरे’ सिनेमातल्या शिवसेनाप्रमुखांच्या व्यक्तिरेखेच्या तोंडून निघालेले डायलॉग्ज आजही वादळ निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरले.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चपखल बसेल असाही एक डायलॉग सध्या जोरदार गाजतोय. ठाकरे सिनेमातल्या ट्रेलरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही जोरदार टोला लगावण्यात आलाय. एकंदरीतच काही डायलॉग्ज हे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन स्फोटक करण्यात आलेत, यात शंका नाही.

शिवसेनेसारखीच स्थिती भाजपचीही आहे. कारण भाजपकडेही स्वत:चं सांगण्यासारखं असं काही फारसं नाही. त्यामुळे गांधी कुटुंबावर टीका करण्याशिवाय दुसरा हुकूमी पत्ता भाजपकडे नाही. त्यामुळे या सिनेमातून भाजपला काँग्रेसवर जी टीका अपेक्षित आहे किंवा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची बदनामी करायची आहे तितकी करण्याची संधी साधून घेण्यात आली आहे, असं ट्रेलरवरून तरी दिसतं.

सिनेमात गांधी कुटुंबाला व्हिलन ठरवलं जात नाही ना, असाही प्रश्न निर्माण होतो. कारण मनमोहन सिंग यांची चितारण्यात आलेली व्यक्तीरेखा ही जाणूनबुजून त्यांना दुबळं दाखवण्याचा प्रयत्न आहे का ? अशी शंका उपस्थित व्हायला वाव आहे. कारण अनुपम खेर यांनी साकारलेल्या व्क्तीरेखेत मनमोहन सिंग यांचे सर्व संवाद हे दुय्यम असल्याचं लक्षात येतं. त्यांची बॉडी लँग्वेज ही पराभूत मानसिकता दाखवणारी असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं.

या सिनेमात राहुल गांधी हे मोबाईलवर खेळत असताना दाखवण्यात आलं आहे. या दृश्यातून त्यांना बालिश दाखवण्याचा प्रयत्न केला तर नाही ना, अशी शंका येते. पण हे इथंच थांबत नाही. कलंकित नेत्यांना निवडणुका लढवण्यापासून रोखणारा अध्यादेश काँग्रेस सरकार काढणार होतं. पण त्या आधी दिल्ली पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी मनमोहन सिंग यांच्यावर टीका करत तो अध्यादेश फाडून टाकला होता. हे दृश्यही सिनेमात चित्रीत करण्यात आलं आहे.

यूपीएचं सरकार मनमोहन सिंग नव्हे तर सोनिया गांधी चालवत होत्या, असाच सूर या सिनेमात लावण्यात आल्याचं दिसतंय.एकंदरीतच द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर सिनेमाचा ट्रेलर पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप होण्याची शक्यता आहे. सिनेमा रिलीज होईपर्यंत राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

– संतोष गोरे, असोसिएट प्रोड्यूसर, tv9 मराठी.

http://santoshgore.blogspot.com/?m=0

#संगो #बाळासाहेब #शिवसेना #भाजप #काँग्रेस #LOKSABHA2019

COMMENTS