विधान परिषदेतील शिवसेनेच्या ऑफरबाबत उर्मिला मातोंडकर यांनी घेतली ‘ही’ भूमिका?

विधान परिषदेतील शिवसेनेच्या ऑफरबाबत उर्मिला मातोंडकर यांनी घेतली ‘ही’ भूमिका?

मुंबई – विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त 12 जागा भरण्याच्या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानंतर आता विधा परिषदेवर लॉटरी कुणाची लागणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
याबाबत शिवसेनेनं उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याच ठरवलं असल्याची माहिती आहे. या प्रस्तावावर उर्मिला मातोंडकर देखील राजी झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. अभिनेत्री कंगना रानौतने बॉलीवूड कनेक्शनच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले असताना उर्मिला मातोंडकर यांनी सर्वप्रथम तिच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. याशिवाय, उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, राजकीय समज आणि राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठीचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत उर्मिला मातोंडकर आता काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान सध्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची नावे निश्चित करुन त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या आहेत. या १२ जागा जून महिन्यात भरणे अपेक्षित होते. मात्र, राज्यपालांनी कोरोना परिस्थितीचे कारण देत या नियुक्त्या पुढे ढकलल्या होत्या. कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा हा प्रस्ताव राज्यपाल मंजूर करणार का हे पाहण गरजेचं आहे.

तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार असल्याची माहिती आहे. या यादीत नव्यानेच राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांचं देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी आमदारकी जवळपास निश्चित झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी सनदी अधिकारी असलेले
शिवाजी गर्जे, मुंबई संघटक आणि सोशल मीडिया सेलच्या प्रमुख आदिती नलावडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचं नाव चर्चेत असल्याची माहिती आहे.

काँग्रेसकडून रजनी पाटील किंवा मोहन जोशी किंवा सत्यजित तांबे, माणिक जगताप किंवा मुझफर हुसेन, सचिन सावंत किंवा नसीम खान आणि नगमा किंवा अनिरुद्ध वायकर
यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना

शिवसेनेकडून सुनील शिंदे, शिवसेना नेते, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, माजी आमदार, आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा मानला जाणारे सचिन अहिर, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई, युवासेना पदाधिकारी, राहुल कनाल, सूरज चव्हाण आणि सलग तीन वेळा शिरुरचे खासदार राहीलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांचंही नाव या यादीत असल्याची माहिती आहे.

COMMENTS