गृहमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर भाजपच्या नगरसेवकांच्या हाती शिवबंधन

गृहमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर भाजपच्या नगरसेवकांच्या हाती शिवबंधन

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मेडिकल काॅलेजच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले होते. तेव्हा त्यांनी शिवसेनेवर टिका केली. त्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर शिवसेनेने भाजपला मोठा झटका दिला आहे. सिंधुदुर्गातील वैभववाडी नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकिय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर हा पक्षांतराचा कार्यक्रम पार पडला.

वैभववाडी नगरपंचायतमधील 7 राणे समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे. हे सर्व नेते भाजप आमदार नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. प्रवेश करत असलेले सर्व 7 माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आणि नगरसेवक आहेत. “सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभववाडी नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांच्याच उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोण काय बोलण्यापेक्षा सिंधुदुर्गातल्या शिवसैनिकांनी भाजपला दिलेलं हे उत्तर आहे”, असं उदय सामंत म्हणाले

“भाजप आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचे घुसणे, मारणे याच्या पलिकडे संवादच होऊ शकत नाही. वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीला चित्र स्पष्ट होईल. वैभववाडीमध्ये जे पक्षांतर झालंय ते विकासासाठी झालं आहे. तिथे विकास होऊ शकला नाही. त्यासाठी या सहा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला स्वीकारलं आहे. त्यांची फार मोठी विकासाची मागणी होती. त्या संपूर्ण परिसराला 14 कोटी रुपयांची नळपाणी योजना आवश्यक आहे. ती योजना देण्याचं उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

“हा फक्त नगरपंचायतपुरता मर्यादित पक्ष प्रवेश आहे. पण अनेक जिल्हा परिषदेचे अनेक सदस्य आमच्या संपर्कात आहेत. जर जिल्हा परिषदेच्या सभापती पदाचे राजीनामे घेतले गेले तर तिथेही सत्ता परिवर्तन होऊ शकते. निवडणुकीनंतर सिंधुदुर्गात जो झेंडा आहे तो बाजूला होऊन शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

COMMENTS