मुंबईच्या महापौरांना घड्याळाची ‘मनसे’ भेट !

मुंबईच्या महापौरांना घड्याळाची ‘मनसे’ भेट !

मुंबई – मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आतापर्यंत घेतलेल्या एकही सभा वेळेत सुरू न झाल्याने मनसेने चक्क महापौरांना भिंतीवरचं घड्याळ भेट म्हणून दिलं आहे. या घड्याळात वेळ पाहून तरी महापौरांनी सभागृह वेळेत सुरू करतील म्हणून त्यांना हे घड्याळ भेट दिल्याचा दावा मनसेनं केला आहे.

विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौरपदाची 8 मार्च रोजी सुत्रे हाती घेतली. तेंव्हापासून महापालिकेच्या सात महासभा पार पडल्या. पण या सातही महासभा एकदाही वेळेत सुरू झाल्या नाहीत. अपवाद फक्त 17 मार्च रोजी पार पडलेल्या पहिल्या महासभेचा. ती महासभाही 13 मिनिटे उशीरानं सुरू झाली होती. आतापर्यंतच्या सहाही महासभा तास ते दीड तास उशिरानं सुरू झाल्याने मनसेचे नगरसेवक भलतेच संतापले होते. त्यामुळे मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे यांनी महापौरांना घड्याळ भेट दिले.

‘महापौरांनी एकही महासभा वेळेत सुरू केली नाही. त्यामुळे आम्हाला सभागृहात तासभर तिष्ठत बसावे लागते. महापौरांची वाट बघावी लागते. ते बिझी असतात हे आम्हाला माहीत आहे. पण याचा अर्थ सर्व नगरसेवकांना गृहित धरणे हे योग्य नाही,’ असं लांडे म्हणाले. महापौरांना वेळेचं महत्व कळावं म्हणून त्यांना घड्याळ भेट दिली आहे. महापालिका त्यांचं काम संथपणे करते. त्यांचे प्रकल्प धीम्यागतीने सुरू आहेत, याचा अर्थ सभागृहही उशिराने सुरू करावं असा होत नाही, असा टोला लांडे यांनी लगावला.

लाख मोलाची महासभा

महापालिकेच्या प्रत्येक महासभेवर एक लाख रूपये खर्च करण्यात येतो. त्यात नगरसेवकांचं मानधन, त्यांचा प्रवास भत्ता,वीज बिल, सभेच्या कार्यक्रम पत्रिकेची छपाई आणि वितरण खर्चाचा समावेश आहे. महापालिकेचे निवडून आलेले सर्व 227 नगरसेवक आणि पाच नामनिर्देशित सदस्य महापालिका महासभेच्या कामकाजात भाग घेतात. महिन्यातून एकदा ही महासभा बोलावली जाते. या सभेत महत्वाचे निर्णय घेतले जातात. स्थायी समितीसह इतर समित्यांमध्ये मंजूर झालेल्या प्रस्तावांना या महासभेत अंतिम मंजूरी दिली जाते. त्याशिवाय महासभेत नागरी समस्यांवर चर्चा केली जाते. तसेच महापौरांच्या निर्देशानंतर महापालिका आयुक्तांना महासभेत येऊन उत्तर देणे बंधनकारक असते.

आतापर्यंत झालेल्या महासभा

# 8 मार्च रोजी दुपारी 12 ची महासभा 12.12 ला सुरू झाली.

# 17 मार्च रोजी दुपारी 11 ची महासभा 11.13 ला सुरू झाली.

# 18 मार्च रोजी दुपारी 12 ची महासभा 12.56 ला सुरू झाली.

# 26 मार्च रोजी दुपारी 3 ची महासभा 3.59 ला सुरू झाली.

# 30 मार्च रोजी दुपारी 2.30 ची महासभा 3.19 ला सुरू झाली.

# 3 एप्रिल रोजी दुपारी 2.30 ची महासभा 3.19 ला सुरू झाली.

# 10 एप्रिल रोजी दुपारी 2.30 ची महासभा 3.18 ला सुरू झाली.

# 11 एप्रिल रोजी दुपारी 2.30 ची महासभा 3.6 ला सुरू झाली.

COMMENTS