मोदी मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल, सुषमा स्वराज यांच्या जागी वसुंधरा राजे ?

मोदी मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल, सुषमा स्वराज यांच्या जागी वसुंधरा राजे ?

पाच राज्यातील निवडणुक संपल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे आपल्या मंत्रीमंडळामध्ये फेरबदल करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच हा फेरबदल अपेक्षीत आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या तब्बेतीच्या तक्रारी गेल्या काही दिवसात वाढलेल्या आहेत. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांना अनेक देशांचा दौरा करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या जागी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर वसुंधरा राजे यांच्या जागी राज्यस्थानचे मुख्यमंत्री म्हणून ओम माथूर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणुक आहे. तिथे अँटी इन्कबन्सीचा फटका बसू नये हेही कारण वसुंधरा राजे यांना केंद्रात हलवण्याचे असू शकते. त्याच धर्तीवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यांनाही याच कारणासाठी केंद्रीय मंत्री केले जाऊ शकते.

 

मनोहर पर्रिकर हे पुन्हा गोव्यात परतल्यामुळे संरक्षण विभागाचा अतिरीक्त भार अरुण जेटली यांच्याकडे आहे. त्यामुळे या फेरबदलामध्ये स्वतंत्र संरक्षणमंत्रीही नेमला जाण्याची शक्यता आहे. एखाद्या नव्या चेह-याला यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची संधी थोडक्यात हुकलेल्या मनोज सिन्हा यांनाही आगामी फेरबदलात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर या डोंगराळ राज्यातील एखाद्या नेत्याला केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळू शकते. तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन काही नवे चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळू शकते.

COMMENTS