योगी आदित्यनाथ यांची निवड म्हणजे 2019 पूर्वी ध्रुवीकरणाचा भाजपचा प्रयत्न ?

योगी आदित्यनाथ यांची निवड म्हणजे 2019 पूर्वी ध्रुवीकरणाचा भाजपचा प्रयत्न ?

 

उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोण ? यावर अनेक खल झाले. चर्चेत नावं वेगळीच होती, निवड मात्र भलत्याच व्यक्तीची झाली. कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असलेले गोरखपुरचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची निवड झाली. योगी आदित्यनाथ यांनी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली. त्यामुळे पक्ष अडचणीत आला. उलटा विचार केला तर त्याचा युपीच्या मतांच्या ध्रुवीकरणात पक्षाला वेळोवेळी फायदाही झाला. त्याचीच बक्षीसी म्हणून त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचं बोललं जातंय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं हा ध्रुवीकरणाचा प्रयत्न केल्याचं बोलंलं जातंय.

सर्जीकल स्ट्राईक, नोटबंदी नंतर रामजन्मभूमी चळवळीचे प्रणेते, आणि कडवे हिंदुत्ववादी योगी आदित्यनाथ यांची निवड म्हणजे मोदी आणि शहा या जोडीची मोठी तिसरी खेळी असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. भाजप पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्ववादाकडे वळल्याचं बोलंल जातंय. हिंदुत्ववादाचं कार्ड खेळल्यामुळे युपीमध्ये भाजपला राज्यात मोठं यश आल्याची भाजपच्या अंतर्गत वर्तुळात चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी आणि शहांनी याच कार्डचा वापर केला होता. कब्रस्तान आणि स्मशनभुमी असा वाद मोदींनी आपल्या प्रचारसभेत अनेकवेळा वापरला होता.

उत्तर प्रदेशाला अनेक महत्वाच्या प्रश्नांनी भेडसावलं आहे.  मागासलेपण, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, शेती आणि शेतक-यांचे प्रश्न या प्रश्नांचं काय होणार याची धास्ती राज्यातल्या काही घटकांना लागली आहे. भाजपनं कडवा हिंदुत्ववाद स्विकारल्यामुळे सबका साथ, सबका विकास या मोदींच्या घोषणेचं काय होणार याचीही चिंता राज्यातल्या जनतेला लागली आहे. योगी आदित्यनाथ यांनी मात्र मुख्यमंत्रीपदाच्या निवडीनंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत आपण नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास या विचारधारेण राज्यकारभार करणार असल्याचं सांगून काही घटकांमध्ये निर्माण होत असलेली चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आदित्यनाथ यांच्यामुळे प्रशासनाला गती मिळेल आणि कायदा सुव्यवस्था चांगली राहील असंही काहीजणांना वाटतंय. या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आता आपल्याला काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

COMMENTS