संघर्ष यात्रा: विखे-पाटलांच्या भाषणा दरम्यान दोन शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

संघर्ष यात्रा: विखे-पाटलांच्या भाषणा दरम्यान दोन शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक – राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा सुरू आहे. काल (दि.-17) विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाशिकमधील पिंपळगाव बसवंत इथे भाषण सुरू होते. यावेळी अचानक काही शेतकऱ्यांनी व्यासपीठावर चढून गोंधळ घातला. व्यासपीठावर गोंधळ घालणाऱ्या या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचं बसवंत इथे भाषण सुरू होतं. तेव्हा दोन शेतकऱ्यांनी  सरकारविरोधी घोषणाबाजी केली. त्यानंतर विखेंनी त्यांना व्यासपीठावर बोलावलं. त्यावेळी त्यांच्या हातात विषाची बाटली आणि दोर होते. कर्जमाफी दिली नाही तर आत्महत्या करण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला.

‘सरकार कर्जमाफी देत नसेल तर, आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या.’ अशा घोषणा या शेतकऱ्यांनी यावेळी दिल्या. व्यासपीठावर आल्यानंतर या दोन्ही शेतकऱ्यांच्या हातून विषाची बाटली आणि दोर कार्यकर्त्यांनी काढून घेतले. या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी दोनही शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं.

दरम्यान, या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी राजकीय नेत्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. सभेतील झालेल्या गोंधळाची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

 

COMMENTS