समाजवादी पार्टीत अखेर फूट, शिवपाल यादव करणार समाजवादी सेक्युलर मोर्चाची स्थापना, मुलायमसिंह यांना करणार अध्यक्ष

समाजवादी पार्टीत अखेर फूट, शिवपाल यादव करणार समाजवादी सेक्युलर मोर्चाची स्थापना, मुलायमसिंह यांना करणार अध्यक्ष

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूकीत समाजवादी पक्षाचा पराभव झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पक्षात अंतर्गत वाद उफाळून आल्याचे समोर आले. आज अखेर समाजवादी पक्षात फूट पडली असून समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते शिवपाल यादव यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. समाजवादी सेक्युलर मोर्चा, असे या पक्षाचे नाव असून या पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव असणार आहेत.

यावेळी बोलताना शिवपाल यादव म्हणाले की, मुलायम सिंह यादव यांचा सन्मान परत आणण्यासाठी आणि समाजवादी लोकांना एकत्र आणण्यासाठी या नवीन पक्षाच्या माध्यमातून काम करण्यात येईल.

मुलायम सिंह यादव यांनी 1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यानंतर गेल्या वर्षभरात पक्षात अंतर्गत वाद-विवाद होत असल्याचे दिसून येत होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी पक्षाच्या तिकीट वाटपावरुन समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा एका बाजूला गट आणि पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव आणि शिवपाल यादव यांच्यासह काही नेत्यांचा एक गट झाल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान, जर अखिलेश यादव यांनी पक्षाची जबाबदारी मुलायम सिंह यादव यांच्याकडे दिली नाही, तर नवीन पक्ष काढला जाईल, असे गेल्या आठवड्यात शिवपाल यादव यांनी सांगितले होते.

COMMENTS