मावळमधील पराभवाची जबाबदारी कोणाची, काय म्हणाले अजित पवार ?

मावळमधील पराभवाची जबाबदारी कोणाची, काय म्हणाले अजित पवार ?

मुंबई – मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला. याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मावळमध्ये झालेला पराभव मी स्वीकारलेला आहे. त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी अजित पवारची आहे. जनतेने या निवडणुकीत दिलेला कौल मी स्वीकारला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
तसेच आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. राज्यात दुष्काळाची समस्या मोठी आहे, त्याचा मुकाबला कसा करायचा याबाबत आम्ही चर्चा केली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार बोलत होते.

दरम्यान या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची समीक्षा करण्यात आली व आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. तसेच बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण म्हणाले की, या बैठकीत प्रारंभी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणूक यावरही चर्चा झाली. महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत आगामी निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढायचे ठरले असून, यासंदर्भात आणखी बैठकी होतील. विखे पाटील यांच्यासोबत आणखी काही आमदार भाजपात जातील असे वाटत नाही. ज्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यावेळी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने इव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंका आहे. महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता त्याबाबत अजून चर्चा झालेली नाही. मनसेला महाआघाडीत घ्यायचे की नाही, याबाबत आज चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

COMMENTS