पेट्रोल पंपात भेसळ झाली की अजित पवारांच्या नावाने बोंब

पेट्रोल पंपात भेसळ झाली की अजित पवारांच्या नावाने बोंब

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेतील त्यांचे भाष्य हे नेहमी चर्चेचा विषय असतो. त्यांची किस्से सांगण्याची पध्दत ही त्यांच्या समर्थकांसाठी पर्वणीच असते. असाच एक किस्सा काल अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात झालेल्या सभेत सांगितला. पवार म्हणाले, “१९९१ मध्ये खासदारकीला उभं असताना मी पेट्रोल पंप चालवायला घेतला होता, पण उद्या कुठे भेसळ झाली, तर अजित पवार भेसळ करतो, अशी बोंब व्हायची आणि माझीच बदनामी व्हायची, त्यामुळे मी तो पंप दुसऱ्यांना चालवायला दिला” असा किस्सा सांगत पवारांनी हशा पिकवला.

खेड तालुक्याच्या चिंबळी भागात खाजगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती पवार म्हणाले, “सध्याच्या केंद्र सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आता पेट्रोलचे दर शंभरीपार गेले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका, एवढे झपाट्याने हे दर वाढत आहेत, पण वाहनं तर घ्यावीच लागतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल सांगितलं की एक वाहन फक्त 15 वर्ष वापरायचं, 15 वर्षांनी ते वाहन स्क्रॅपमध्ये गेलं पाहिजे. असा नवा नियम आला आहे. नाहीतर आपल्या इथे किती तरी वर्ष वाहनं वापरणारे लोक आहेत” अशा कोपरखळ्या मारल्या.

“मी 1991 मध्ये खासदारकीला उभा होतो, तेव्हा लोणीकंदमध्ये स्वस्तात जमिनी मिळत. पुढे-मागे आपलाही पेट्रोल पंप असावा, म्हणून मी विकत घेतला. माझेही पंप वाघोली, लोणी काळभोर येथे आहेत. त्यावेळी पेट्रोलमध्ये भेसळीचं प्रमाण जास्त होतं. उद्या कुठे भेसळ झाली तर अजित पवार भेसळ करायचा अशी बोंब व्हायची आणि माझीच बदनामी व्हायची, त्यामुळे मी तो पंप चालवायला दिला” असा किस्सा सांगत अजित पवार यांनी हशा पिकवला.

COMMENTS