तुम्ही राजा तर मी सरदार, आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर !

तुम्ही राजा तर मी सरदार, आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर !

औरंगाबाद –  तुम्ही राजा आहात तर मी सरदार आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी रामदास आठवले हे कागदी वाघ असून मीच राजा आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मला दलित चळवळीमध्ये डावलले जाऊ शकत नाही. रिपब्लिकन ऐक्य व्हायला हवं आणि ते फक्त प्रकाश आंबेडकरच करू शकतात. परंतु माझं मंत्रिपद घालवण्यासाठी ते जर हे ऐक्य करत असतील तर मी शिवसेना-भाजपा सोबतच राहणार असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमासाठी औरंगाबादमध्ये आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान ऐक्य करण्यासाठी मी सकारात्मक आहे. एका दिवशी स्टेजवर येऊन ते होणार नाही, त्यासाठी फॉर्म्युला तयार करण्याची गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय ते होऊ शकत नाही. मात्र ऐक्य झालं की फुटता येणार नाही आणि कोणी फुटले तर त्यांच्यासोबत जायचे नाही. हे समाजाने ठरवले तरच हे ऐक्य टिकेल. नेते स्वतःच्या फायद्यासाठी फुटले तर समाज एकसंध राहिला हवा. १९९५ ला सर्व एकत्र आल्यावर चार खासदार निवडून आले. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन पक्षाची स्थापना केली. तसे होता कामा नये असंही आठवले यांनी म्हटलं आहे.दरम्यान कोरेगाव भीमाच्या बंदमध्ये माझा पक्ष आघाडीवर होता. मात्र, मंत्री असल्याने मी जास्त बोलू शकत नव्हतो, त्यामुळे मी बॅकफुटवर गेलो असे कुणी समजू नये. असंही त्यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS