लोकसभेचे पडघम – बीडमधून राष्ट्रवादीच्या “या” दोन नेत्यांमध्ये तिकीटासाठी जोरदार चुरस !

बीड – लोकसभेची निवडणुक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांमध्ये आघाडी होण्याची शक्यता आहे. त्याच्या जागावाटपाचे सूत्र अजून ठरलेले नाही. मात्र तरीही काही मतदारसंघ हे आपल्याकडेच राहतील असं गृहीत धरुन काही पक्षांनी काही जणांना तयारी लागा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे या संभाव्य उमेदवारांनी मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमरसिंह पंडित यांना तयारी लागा असा आदेश पक्षाने दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. पवार काका पुतण्यांचे विश्वासू आणि  मतदारसंघात फारसे पक्षांतर्गत विरोध नसलेले म्हणून अमरिंह पंडित यांची ओळख आहे. तसंच मतदारसंघातील जातीचे गणित लक्षात घेऊनही त्यांना तिकीट मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.

अमरसिंह पंडित यांचं तिकीट निश्चित झालं असताना कहानी में ट्विस्ट आया है अशी स्थिती झाली आहे. त्याचं कारण पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते आणि बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बीडमधून पक्षाकडे तिकीट मागितले आहे. तसा प्रस्ताव त्यांनी थोरले आणि धाकटे पवार यांच्याकडे दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. लोकसभेला जयदत्त क्षीरसागर आणि विधानसभेला युवा नेते संदीप क्षीरसागर यांना तिकीट द्यावे असा प्रस्ताव त्यांनी पक्षाकडे ठेवल्याचं कळतंय. यामुळे क्षीरसागर घराण्यातील वाद मिटेल आणि दोन्ही जागा पक्षाला मिळतील असां जयदत्त क्षीरसागर यांचा दावा असल्याचं कळतंय.

जयदत्त क्षीरसागर यांच्या नव्या प्रस्तावामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. एकतर अमरसिंह पंडित यांची नाराजी ओढून घ्यावी लागेल. दुसरी गोष्ट म्हणज्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जयदत्त यांनी राष्ट्रवादीविरोधात केलंलं काम आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही त्यांनी सुरेश धस यांना मदत केल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसात जयदत्त यांची मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत चांगलीच उठबस वाढलेली आहे. त्यामुळे जयदत्त यांच्यावर किती विश्वास ठेवावा असा प्रश्न पक्षासमोर पडलेला असणार आहे.

जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये जाणार अशाही जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आहेत. मात्र बदलत असलेली राजकीय हवा, बीडमधील राजकीय समिकरणे पाहता भाजपमध्ये जाणे कदाचित त्यांना परवडणारे नाही हा विचार करुन त्यांनी पक्षबलाचा निर्णय रद्द केला असण्याची शक्यता आहे. त्यातच माजलगावचे नेते आणि माजी मंत्री प्रकाश सोळुंके हे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपासून क्षीरसागर यांच्यावर नाराज आहेत. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत रमेश कराड यांना उमेदवारी देऊन पक्षाला तोंडघशी पडावं लागलं होतं. त्यामुळे आता या प्रकरणात पक्षाचे नेते ताकही फुंकून पितील. त्यामुळे बीडमध्ये नेमक्या घडामोडी काय घडतात ते येत्या काळात स्पष्ट होईल.

COMMENTS