“त्या” ऑडिओ क्लिपमुळे भाजप अडचणीत, सीबीआय कारवाईबाबत भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये संभाषण !

“त्या” ऑडिओ क्लिपमुळे भाजप अडचणीत, सीबीआय कारवाईबाबत भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये संभाषण !

कोलकता – पश्चिम बंगालमध्ये सीबीआयच्या कारवाईवरुन केंद्र सरकार विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. दोन्ही बाजूकडून राज्यघटनेची पायमल्ली होत असल्याचा आरोप होतोय. सीबीआय भाजपच्या इशा-यावर काम करत असल्याचा आरोप तृणमुल काँग्रसने केला आहे. राज्याच्या स्वायत्ततेवर हा घाला असल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई केली पण पश्चिम बंगाल सरकार त्याला आडकाठी करत असल्याच सांगत हे राज्यघटनेचं उल्लंघन असल्याचा प्रतिहल्ला भाजपनं केला आहे.

सीबीआय भाजपच्या इशा-यावर काम करत असल्याच्या ममता बॅनर्जी आणि विरोधकांच्या आरोपाला पुष्टी देणारी ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याबाबतचं वृत्त पश्चिम बंगालमधील आघाडीचं दैनिक आनंदबझार पत्रिकाने दिलं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय आणि पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते मुकूल रॉय यांच्यातील संभाषण आहे. संभाषणातील आवाज आपला असल्याचं मुकूल रॉय यांनी कबूल केल्याचा दावाही बातमीमध्ये करण्यात आला आहे. आपले फोन टॅप केले जात असून आपण त्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशाराही मुकूल रॉय यांनी दिला आहे.

चिटफंड घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये सीबीआयची भीती दाखवता येईल का असा प्रश्न मुकूल रॉय यांनी विचारला आहे. पश्चिम बंगालमधील 4 आयपीएस अधिका-यांवर लक्ष ठेवावं लागेल. त्यांना सीबीआयकडून धमकावलं तर ते घाबरतील. असंही मुकूल रॉय संभाषणात म्हणत आहेत. अमित शहा यांच्याकडून आपल्याला काही मेसेज आला आहे का ?  या प्रश्नावर मुकूल रॉय यांनी वरील उत्तर दिलं आहे. ते लवकरच पश्चिम बंगालमध्ये येत आहेत असंही कैलास विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणज्ये मुकूल रॉय हेही चिटफंड घोटाळ्यातील आरोपी आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच तृणमुल काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या ऑडिओ क्लिपमुळे भाजपच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. एका इंग्रजी वेबसाईटनेही ही बातमी दिली आहे.

COMMENTS