मराठा समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी भाजपकडून आरोप – शशिकांत शिंदे

मराठा समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी भाजपकडून आरोप – शशिकांत शिंदे

सातारा – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. यापूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघाले होते. तेव्हा फडणवीस यांनी हे प्रश्न मार्गी का लावले नाहीत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी भाजपच्यावतीने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, उदयनराजे आरोप करीत असल्याची टिका शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या. मराठा समाजाला आरक्षण देण्याची हमी मी देतो, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी अलिकडेच केले आहे. त्यास राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांनी मागणी करणे स्वाभाविक आहे. पण तेच मराठा समाजाचे नेतृत्व का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजवटीत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आणि धनगर समाजाचे मोर्चे निघाले होते. फडणवीस यांनी तर धनगर समाजाला आरक्षण देण्याचे लेखी आश्वासनही दिले होते. मग हे विषय त्यांनी मार्गी का लावले नाहीत. पाच वर्षांच्या सत्ताकाळात फडणवीस यांनी दोन्ही समाजाच्या रास्त मागण्यांना किती न्याय देण्याचा प्रयत्न केला, असा सवाल शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

भाजपच्या काळात मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेले वकीलच आताही हा खटला सर्वोच्च न्यायालयात लढवत आहेत. पण तरीही याप्रश्नी जाणीवपूर्वक राजकारण करण्यात येते. मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असून भाजप देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

COMMENTS