भाजप सरकार बडतर्फ करुन काँग्रेसला बहूमत सिद्ध करण्याची संधी द्या, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी !

भाजप सरकार बडतर्फ करुन काँग्रेसला बहूमत सिद्ध करण्याची संधी द्या, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी !

पणजी – राज्यातील भाजप आघाडी सरकार बडतर्फ करुन काँग्रेसला विधानसभेत बहुमत सिध्द करण्याची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसनं राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्याकडे केली आहे. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या १३ आमदारांनी दुपारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली. कर्नाटकातील न्याय गोव्यातही लावावा आणि विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करावे असं काँग्रेस आमदारांनी राज्यपालांना म्हटलं आहे. या मागणीवर अभ्यास करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले असल्याची माहिती आहे.

कर्नाटकात विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिल्याच्या पार्श्वभूमीवर हाच न्याय राज्यपालांनी गोव्यातही लागू करावा आणि काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करावे अशी मागणी या आमदारांनी केली आहे. राज्यपालांकडे या शिष्टमंडळाने सुमारे पाऊण तास चर्चा केली. तसेच ‘काँग्रेसचे १७ आमदार असताना आणि विधानसभेत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असताना १२ मार्च २0१७ रोजी राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण देऊन मोठी चूक केली हे त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिले असल्याचं विरोधी पक्षनेते कुवळेकर यांनी म्हटलं आहे.तसेच ही चूक त्यांनी सुधारावी आणि सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला निमंत्रण द्यावे, अशी मागणीही त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

COMMENTS